Investment Dispute | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवरून फिल्मीस्टाईल हाणामारी

सावंतवाडीतील घटनेने खळबळ; पुण्यातील एकाची पावणेपाच कोटींची फसवणूक
Investment Dispute
1) सावंतवाडी : येथील गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेली पुण्यातील संशयितांची फॉर्च्युनर कार. 2) शहरातील अविघ्न कॉम्प्लेक्स येथे तपास करताना पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, अधिकारी व कर्मचारी.
Published on
Updated on

सावंतवाडी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या पैशांच्या देवघेवीवरून फिल्मीस्टाईल अपहरण, मारामारी, अंगावर गाडी घालणे, दगडफेक करणे, गाड्यांच्या काचा फोडणे अशी घटना सावंतवाडी शहरात घडली. शनिवारी दुपारपासून हा प्रकार मध्यरात्रीपर्यंत सुरू होता.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानुसार पुणे येथील शंभूराज देवकाते व अन्य चार मिळून एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पुणे येथील देवकाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंच्या एकूण 9 जणांना अटक करून त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता 28 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 11 आरोपी आहेत. उर्वरित 2 संशयित फरार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

सावंतवाडी येथील सागर कारिवडेकर यांना पुणे येथील शंभूराज देवकाते यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याकरिता पावणेपाच कोटी रुपये दिले होते. त्या पैशाच्या देवघेवीवरून गेली कित्येक दिवस सागर कारिवडेकर व श्री. देवकाते यांच्यात बातचीत सुरु होती. दरम्यान महिन्याभरापूर्वी श्री. कारिवडेकर यांनी पैशांच्या बदल्यात श्री. देवकाते यांना सावंतवाडी-सर्वोदयनगर येथे आपल्या बंगल्यातील आलिशान पोर्शे कार घेवून जाण्यास सांगितली होती. ती कार नेण्यासाठी पुणे येथील शंभूराज देवकाते हे शनिवारी फॉर्चूनर कार घेऊन अन्य चार जणांना घेवून सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी शनिवारी दुपारी कारिवडेकर यांचे सुपरवायझर नितीन मेस्त्री यांना फोन करुन गाडी ताब्यात देण्यास सांगितली. दरम्यान पोर्शे कार देण्यास सुपरवायझर मेस्त्री टाळाटाळ करु लागल्याने संशयितांनी त्याला मारहाण केली.

त्यानंतर मेस्त्री याने कारचे मालक श्री. कारिवडेकर यांच्याशी संपर्क साधून कार संध्याकाळी घेवून जा, असे देवकाते यांना सांगितले. त्यानंतर देवकाते, त्यांचे सहकारी गाडीची चावी घेण्यासाठी मेस्त्री यांच्या फ्लॅटवर गेले. मात्र फ्लॅटला टाळे असल्याने त्यांनी लोखंडी सळीने टाळे तोडले व आत प्रवेश केला. मात्र फ्लॅटमध्ये गाडीच्या चाव्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे देवकाते व सहकारी सुपरवायझर मेस्त्री याला घेवून कारिवडेकर यांच्या सर्वोदय नगर येथील बंगल्याकडे गेले. रात्री 11 वा. त्यांनी पोर्शे कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कारच्या पाठीमागे मर्सिडीज कार उभी असल्याने त्याचा अडथळा होवू लागला. त्या कारची चावी ऑफिस मध्ये असल्याने देवकाते व सहकार्‍यांनी ऑफिसच्या खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला.

मात्र ऑफिसमध्ये मर्सिडीजची चावी सापडली नाही. यामुळे पोर्शे कार नेण्याचे प्रयत्न फोल ठरले. त्यानंतर सुपरवायझर मेस्त्री व देवकात हे सहकार्‍यांसह बंगल्याच्या बाहेर आले असता मध्यरात्री 12.30 वा. कारिवडेकर यांच्या बंगल्याच्या गेट बाहेर तीन संशयित उभे होते. त्यांच्याकडील कारमध्ये अन्य एक संशयीत लोखंडी रॉड व दगड घेवून बसला होता. त्यांनी देवकाते व सहकार्‍यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तुम्ही बंगल्यात प्रवेश कसा केला? असे विचारत तेथे वादावादी करण्यास सुरुवात केली. याचवेळी गोव्यातून आलेल्या पुण्यातील शौनक सकपाळ व अशोक काकडे यांच्या अंगावर गाडी घालत त्यांना रस्त्यावर पाडले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडीत तेथून जाणार्‍या अन्य पर्यटकांच्य कारला देखील त्यांच्या गाडीने धडक दिली. ही सर्व घटना शनिवारी मध्यरात्री फिल्मीस्टाईल पध्दतीने सुरु होती. शनिवार रात्री या घटनेनंतर पोलीसांनी तातडीने शोध मोहीम राबवून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. यात पुण्यातील शौनक सकपाळ हा जखमी झाला असून त्याचावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या सर्व घटनेचा उलघडा होण्यासाठी पोलीसांनी फॉरेन्सिक टीम मागवली आहे. पोलिसांनी फॉर्चूनर व स्वीफ्ट अश्या दोन कार जप्त केल्या आहेत.

गुन्हे दाखल केलेले अन् अटक केलेले दोन्ही बाजूंचे संशयित

पुण्यातील संशयित शौनक प्रकाश सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सागर कारिवडेकर यांचा सुपरवायझर नितीन वामन मेस्त्री याच्यासह तहा राजगुरू, अब्दूल खान, तेयशील दरवाजकर व अन्य दोन असे मिळून सहाजणांवर अंगावर गाडी घालून दुखापत करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दगडफेक करून जखमी करणे, शिवीगाळ करून धमकी देणे आदी कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी मेस्त्री याच्यासह चारजणांना रविवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सावंतवाडी येथील सागर कारिवडेकर यांचे सुपरवायझर नितीन मेस्त्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून शंभूराज देवकाते, शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल ढिवरे, श्रीकांत कांबळे (सर्व रा.पुणे) यांच्यावर अपहरण करून घरफोडी करणे, मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणे आदी कलमान्वये पाचही जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांनाही न्यायालयात हजर केले असता 28 पर्यंत दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ उडाली असून एकूण दहा कोटी रुपयांचा हा व्यवहार असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news