

ओरोस : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यावसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत (एफडीए) करण्यात येणाऱ्या तपासण्या व कारवाया योग्यच आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असून, व्यावसायिकांनी प्रशासनाच्या तपासणी व कार्यवाहीस आवश्यक ते सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्या व कारवाया या संबंधित कायदे, नियम आणि निर्धारित प्रक्रियेनुसारच करण्यात येत आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, तसेच त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियम व विनियमांच्या आधारे अन्न व्यवसायांची तपासणी, नमुने घेणे, आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही आदी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने कारवाईबाबत गैरसमज न ठेवता आपल्या आस्थापनेतील त्रुटी दूर करून नियमांचे पालन करण्यास प्राधान्य द्यावे.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायांना विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याचे कारण नाही; मात्र नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कायद्यानुसार कार्यवाही होणे अपरिहार्य आहे.