

कणकवली ः देशातील ज्या चांगल्या गोशाळा आहेत त्यातील उत्तम गोशाळा कोकणातील करंजेसारख्या निसर्गरम्य परिसरात खा. नारायण राणे यांनी उभी केली आहे. खरे तर ही केवळ गोशाळा नसून हे गोअनुसंधान केंद्र आहे, महाराष्ट्राचा इतिहास पाहता ज्या भागात गोधन कमी झाले आहे, त्या भागात आत्महत्या वाढल्या आहेत, केमिकलयुक्त शेतीमुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे मात्र गोमातेच्या संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेती शक्य नाही. देशी गायींचे संवर्धन करूनच शेती आणि शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.
कै. तातू सिताराम राणे ट्रस्टच्यावतीने खा. नारायण राणे यांनी कणकवली-करंजे येथे उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, सौ. नीलम राणे, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आ. नीलेश राणे, अभिराज राणे, आ. दीपक केसरकर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी आ. प्रमोद जठार, राजन साळवी, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खा. नारायण राणे यांनी हाती घेतलेले कोणतेही काम नीटनेटके आणि गुणवत्तापूर्ण असते, ते गुणवत्ता पारखी असून त्यातूनच ही दर्जेदार गोशाळा उभी राहिली आहे. या गोशाळेच्या माध्यमातून व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने याठिकाणी घेतली जाणार आहेत. कृषी आणि पशुसंवर्धन पर्यटन केंद्र येथे तयार झाले आहे. आपल्या सनातन संस्कृतीत गोमातेचे महत्व फार मोठे आहे. सनातन संस्कृती केवळ मूर्ती पूजक नाही तर निसर्ग पूजक देखील आहे. आपल्या सनातन संस्कृतीने निसर्गातील सर्व घटकांच्या संवर्धनाची संकल्पना मांडली आहे, त्यात गोमातेला उच्च दर्जा आहे.
गोमाता ही आपण आईसारखी मानतो, तिच्यात ईश्वराचा वास असतो असेही आपण मानतो. कृषी संस्कृतीत गोमातेला पर्याय नाही. ज्याकाळात कृषी हाच महत्वाचा व्यवसाय होता, त्या काळात शेती समृद्ध होती, कारण गोमातेचं महत्त्व आपण जाणून घेतलं होतं. गोमाता ही अशी आहे, जी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला देतच राहते. भाकड झाली तरी शेण, गोमुत्र या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीना काही मिळतं, ती देणारी आहे, घेणारी नाही. पंरतू हळूहळू आपण कॅशक्रॉपकडे वळल्यानंतर चार्याचा प्रश्न निर्माण झाला. चारा नाही म्हणून गोधन विकलं आणि गोधन नसल्याने नैसर्गिक शेती बंद झाली. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक शेतीपासून शेतकरी दुर होत गेला आणि त्या त्या ठिकाणची शेती अडचणीत आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केमिकल युक्त शेतीतून काही काळ उत्पादकता वाढली पण शेतीचा पोत खराब होत गेला आणि उत्पादन क्षमताही घटली तर काही ठिकाणी जमिनीची उत्पादन क्षमताच संपली, यामुळे आता नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल. देशी गायीचे शेण, गोमुत्र या गोष्टींचे मिश्रण करून तयार केलेल्या खताच्या वापरातून शेतीची उत्पादकता दीड ते दोन पटींनी वाढते. नैसर्गिक शेती हाच आता पर्याय आहे. त्यासाठी देशात आणि राज्यात आपण नैसर्गिक शेती मिशन राबवण्याचे ठरवले आहे. 25 लाख हेक्टर शेती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन आहेे. गोमातेच्या संवर्धनासाठी तिला राज्यमातेचा दर्जा दिला आहे, त्यासाठी आयोग तयार केला आहे. देशी गायींच्या संवर्धनाकरिता, चार्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ब्राझीलसारख्या देशाने भारतीय देशी गायींचे महत्व ओळखून त्यांचे संवर्धन केले. त्याची सेक्स सॉर्टेड सीमेन टेक्नॉलॉजी आता आपल्याला ब्राझीलकडून आणावी लागते. पण इथे आता देशी गायींचे संवर्धन होत आहे हे पाहून आनंद झाल्याचे ना. फडणवीस म्हणाले. देशी गायींच्या शेणापासून खत आणि रंगनिर्मिती करता येते. शेणापासून रंगनिर्मितीसाठी इन्सेटिव्ह देण्याचा निर्णय आपण घेतला असून जेणेकरून शेतकर्यांना त्याचा फायदा होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खा. नारायण राणे यांनी कै. उभारलेला हा प्रकल्प कोकणातील शेतकर्यांसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. इथे आल्यानंतर गोशाळा पाहून देवभूमीत आल्यासारखे वाटले असे सांगत, कोेकणचे महत्व सांगणारे मालवणी भाषेतील ‘स्वर्गापेक्षा सुंदर आसा...’ या गाण्याच्या ओळी ना. शिंदे यांनी बोलून दाखवल्या. गायीला आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. ती केवळ पवित्रच नाही तर उपयुक्तही आहे. आपण मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. धार्मिक आस्था, जैविक शेती, पर्यावरणपूरक जीवनशैली समृद्ध करण्याचे काम या गोशाळेच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. कोकणात धवलक्रांतीचा पाया रचला जाईल असा विश्वास ना. शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आपल्या गावी गोशाळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात खा. नारायण राणे यांनी गोशाळा स्थापन करण्या मागचा उद्देश स्पष्ट केला.जिल्हयातील, राज्यातील लोकांमध्ये समृद्धी यावी, त्यांचे प्र्रबोधन व्हावे तसेच गोमातेची सेवा घडावी हा उद्देश असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांचा गायीची चांदीची प्रतिमा देवून खा. राणे यांनी सत्कार केला. आभार पालकमंत्री नीतेश राणे, आ. नीलेश राणे यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशी गायींचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होणे आवश्यक आहे. शासनाच्या माध्यमातूनही शेतकर्यांना देशी गायींचे सेक्स सॉर्टेड सीमेन उपलब्ध करून दिले जाईल. जेणेकरून देशी गायींची संख्या महाराष्ट्रात वाढेल आणि गोसंवर्धनही होईल. विदर्भातील गवळ गाय देखील या गोशाळेत आणावी, तीही या देशी गायींपैकी चांगली गाय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.