

कुडाळ : यावर्षी आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवत संपूर्ण उत्सव काळात पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले. याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे संपूर्ण गावात उत्सवाची साजशृंगारता व निसर्गपूरकता यांचा सुरेख समन्वय पाहायला मिळाला.
आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने गाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने पर्यावरणस्नेही सजावट करण्यात आली. नैसर्गिक साहित्य, पुनर्वापरायोग्य वस्तू, मातीच्या गणेशमूर्ती, नैसर्गिक फुलांची सजावट आदींचा वापर करत सर्जनशीलतेचा अप्रतिम आविष्कार गावकर्यांनी घडवून आणला.
ग्रामपंचायतीच्या आवाहनानुसार फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाला आंदुर्लेवासीयांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात वायू प्रदूषणात लक्षणीय घट झाली. तसेच आवाजाचे प्रदूषणही कमी झाले.
गणेश विसर्जनासाठी गावात विशेष गणेश कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती गणेश मूर्तींचे नागरिकांनी या कुंडांमध्येच विसर्जन करून जलप्रदूषण कमी करण्यास हातभार लावला. विसर्जनानंतर मूर्ती संकलन व व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र व्यवस्था केली होती.
गणेशोत्सवाच्या काळात गावातील आंदुर्ले बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी ‘डोम डस्टबिन्स’ ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्लास्टिक व इतर कचर्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. तसेच, गावात निर्माल्य संकलनासाठी ‘निर्माल्य कलश’ ठेवण्यात आले. हे संपूर्ण व्यवस्थापन गावकर्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.
आंदुर्ले ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकारातून आता घराघरांतून ओला-सुका कचरा वेगवेगळा करून संकलनाची योजना राबवण्यात येणार आहे. या गणेशोत्सव काळात ग्रामस्थांचा सहभाग, जागरूकता आणि सहकार्य उल्लेखनीय होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमांना लाभलेला प्रतिसाद हा भावी पिढीसाठी निसर्गसंवर्धनाचा आदर्श ठरेल.
अक्षय तेंडोलकर, सरपंच - आंदुर्ले ग्रा. पं.