

सावंतवाडी ः मुंबई -गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव डंपर दोन वेळा उलटला. या अपघातात डंपर चालक सिद्धेश सखाराम पालकर (27, रा. गोवेरी-कुडाळ) याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11.30 वा. च्या सुमारास मळगाव ब्रिजवर हा अपघात झाला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डंपर चालक सिद्धेश पालकर हा डंपर घेऊन सकाळी गोवा येथे गेला होता. तेथे माल खाली करून तो झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरून कुडाळला परतत होता. दरम्यान, या बायपास महामार्गाचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण काम सुरू आहे. यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. मळगाव ब्रिजवर केलेल्या रस्ता खोदाईचा डंपर चालक सिद्धेश पालकर याला अंदाज आला नाही. परिणामी, भरधाव वेगात असलेल्या डंपर खोदलेल्या रस्त्यात उतरून तो अनियंत्रित झाला व रस्त्यावर पलटी होत दोन वेळा मारली गोल फिरला. यात डंपरचालक सिद्धेश पालकर हा गंभीर जखमी झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, कॉन्स्टेबल महेश जाधव, संजय कोरगावकर, सचिन चव्हाण, मळगाव पोलिसपाटील गीता गावडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणा कामामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीस तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वेत्ये तिठ्यावर चॉकलेट फॅक्टरीकडे हायवेवरून जाणार्या गाड्यांना सर्व्हिस रोड देण्यात आला आहे. तेथून वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र रात्रीच्यावेळी हे डायव्हर्शन लक्षात न आल्याने डंपर थेट खणून ठेवलेल्या रस्त्यात उतरला व हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली. अशाच प्रकारे रात्रीच्या वेळी हायवेवर यापूर्वीही देखील दोन ते तीन वाहनांचा अपघात झाला असून कित्येक जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
ठेकेदार कंपनी तसेच महामार्ग प्राधिकरणने या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारी न घेतल्यानेच हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर तसेच माजी सभापती राजू परब यांनी केली. दरम्यान, मंगळवारी सकाळी मृत सिद्धेशचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.