

मालवण : मालवण-देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर शनिवारी सकाळी डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बैलाला स्थानिक नागरिक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदत करून डॉक्टरांमार्फत उपचार करून पुढील उपचारासाठी वैभववाडी येथील गोशाळेत पाठवले.
देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर शनिवारी स. 10. 30 वा. च्या सुमारास एका भरधाव डंपरने बैलाला धडक दिली. या अपघातात बैल गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत बैलाला रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलविले. घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे संयोजक गणेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार अनिकेत फाटक यांनाही बोलावण्यात आले. दोघांनी मिळून जखमी बैलाच्या मालकाचा शोध घेतला. मात्र बैल कोणाचा आहे, हे समजू शकले नाही.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रजत दळवी यांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर बैलाच्या स्थितीची गंभीरता लक्षात घेता अधिक उपचारासाठी वैभववाडी येथील गाय-वासरु गोशाळा, खांबाळे येथे हलविण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार अनिकेत फाटक यांनी गोशाळेशी संपर्क साधून स्वखर्चाने जखमी बैलाला तेथे उपचारासाठी पाठविले.
या वेळी गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, भाऊ सामंत, स्वप्नील घाडी, प्रसाद हळदणकर, श्रीनाथ निकम, विकास गोवेकर तसेच श्री महापुरुष बाळ गोपाळ मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. या घटनेत दाखविलेल्या सामाजिक जाणिवा, तत्परता व सेवाभावी वृत्तीबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने अनिकेत फाटक, गणेश चव्हाण व डॉ. रजत दळवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.