

कणकवली ः खारेपाटणनजीक साळीस्ते येथे मृतावस्थेत आढळलेल्या बंगळूर येथील श्रीनिवास गणेश रेड्डी (वय 53) यांच्या खूनप्रकरणी बंगळूर येथून अटक केलेल्या तीन आरोपींना बुधवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. कणकवली व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 9 जणांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा खून हा प्रॉपर्टीच्या वादातूनच झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना घेऊन पोलिस पथके कणकवलीत दाखल झाली. मधुसुदन सिद्धय्या तोकला (52, रा. बंगळूर), सुभाष सुब्बारायाप्पा एस. (32), नरसिंम्हा नारायणस्वामी मूर्ती (36, दोन्ही रा. कोलार, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या खून प्रकरणी ‘मन्न’ नामक आणखी एका संशयिताला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून त्याला बुधवारी सायंकाळी उशिरा कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वरील चारही संशयतांना अटक करण्यामध्ये एलसीबीची टीम व त्यांचे टीमलिडर पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
याबाबत कणकवलीचे पोलिस निरीक्षक तेजस नलावडे म्हणाले, डॉ. रेड्डी यांचा खून हा प्रॉपर्टीच्या वादातूनच झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. डॉ. रेड्डी यांचे बंगळूर येथे डेंन्टल व नर्सिंग कॉलेज आहे. या आणि इतर प्रॉपर्टीच्या वादातूनच हा खून झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काहीजणांचाही यात सहभाग आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व कणकवली पोलिसांचे एक पथक अद्यापही बंगळूर येथे ठाण मांडून आहे.
दरम्यान तीन संशयितांना बुधवारी सायंकाळी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितांनी श्रीनिवास यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला? खून प्रकरणांमध्ये किती आरोपी आहेत? गुन्ह्यातील वाहने, शस्त्रे जप्त करणे आदींच्या तपासासाठी तिन्ही संशयितांना पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती पोलिसांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीला गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनूसार डॉ. श्रीनिवास रेड्डी यांना संपविण्याचा कट रचून त्यांना गोवा मार्गे सिंधुदुर्गात आणण्यात आले. साळिस्ते येथे गाडीतच त्यांचा खून करण्यात आला आणि मृतदेह टाकण्यात आला, तर गाडी तिलारी परिसरात टाकण्यात आली.
आतापर्यंत जे चार आरोपी गजाआड झाले, त्यामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मागील चार ते पाच दिवसांपासून बंगळूर येथे कार्यरत आहे. गुप्त माहितीगारातर्फे अगदी सापळा रुचून एलसीबीच्या पथकाने चारही संशयितांना बंगळूर परिसरात ठिकठिकाणी अटक, करण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे. एलसीबीच्या या कामगिरीचे सिंधुदुर्ग पोलिस दलातून कौतुक होत आहे.
डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा खून कट रचून करण्यात आल्याचे तपासात पुढे येत आहे. या घटनेमध्ये मधुसूदन हाच मुख्य आरोपी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मधुसूदन व मयत श्रीनिवास यांच्यात गेल्या काही वर्षांपासून व्यवसायिक संबंध होते. या व्यवसायिक वादातूनच मधुसूदन याने श्रीनिवास यांना ठार मारण्याचे कृत्य केले असावे, अशा निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी प्रत्यक्ष खून करताना सहभागी होता तर इतर आरोपी थेट खूनात सहभागी होते की नाही? याबाबत पोलिस तपास करत आहेत.