

दोडामार्ग ः दोडामार्ग तालुक्यात वारंवार भेडसावत असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्यांबाबत शुक्रवारी आयोजित महावितरण व ग्राहकांची संयुक्त बैठक वादळी ठरली. महावितरणच्या कुचकामी व निष्क्रिय कारभारावर संतप्त ग्राहकांनी अधिकार्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. मात्र अधिकार्यांनी मौन बाळगले. यामुळे ग्राहकांचा संताप वाढला व तात्काळ वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवा असे खडसावले.
पावसाळा सुरू झाल्यापासून दोडामार्ग तालुक्यात सातत्याने खंडीत वीज पुरवठा होत आहे. याचा फटका ग्रामीण भागासह दोडामार्ग शहरातील नागरिकांना बसत आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वीज ग्राहक संघटना व महावितरणच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक दोडामार्ग विद्युत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, उपकार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, नगरसेवक आणि ग्राहक उपस्थित होते.
बैठकीत वीज ग्राहकांनी अधिकार्यांना थेट सवाल करत वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि कुचराईचा पाढा वाचला. वाहिन्यांवर वाढलेल्या झाडांची छाटणी, तुटून पडणार्या जीर्ण वाहिन्या, उन्मळून पडधारे वीज खांब, सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा, आदीं समस्यांबाबत वीज कर्मचारी काय करत आहेत?, असे प्रश्न विचारत संतप्त ग्राहकांनी वीज अधिकार्यांना जबाबदार धरले. फोन लावला तर कर्मचारी फोन उचलत नाही, शाखा अभियंता गैरहजर असतात, पावसाळ्यापूर्वी करावयाची डागडुजीची कामे पूर्ण झाली नाहीत, कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना उभे राहावे लागते, त्यांना बसायला खुर्च्या दिल्या जात नाहीत, अश्या अनेक मुद्यांवर ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
वीज कर्मचारी ऐकत नाहीत, ही जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला समस्या सोडवायला जमत नसतील तर खुर्ची सोडा! अशी मागणी करत ग्राहक आक्रमक झाले. ग्राहकांचा हा आक्रमक पवित्रा पाहून अधिकार्यांनी मौन धारण केले. अखेर सर्व पक्षीय पदाधिकारी व आमदार यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी सांगितले. बैठकीदरम्यान अनेक ग्राहकांनी आपल्या वीज समस्या लेखी स्वरूपात सादर केल्या.
सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी ग्राहकांच्या समस्या जाणून घेत या समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील जीर्ण झालेले विद्युत पोल, विद्युत वाहिन्या व अन्य साधनसामुग्रीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 75कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
ग्राहक आणि विद्युत महामंडळाचे अधिकारी यांच्या समवेत झालेली संयुक्त बैठक ही आमदारांच्या उपस्थितीत व्हायला हवी. आमदारांना देखील आपल्या मतदारसंघातील समस्या समजल्या पाहिजेत. जनता कशाप्रकारे समस्यांना सामोरे जात आहे, हेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. त्यामुळे ही बैठक आमदारांच्या उपस्थितीतच झाली पाहिजे. आमदार या बैठकीला आलेच पाहिजेत अशी आग्रही मागणी जि. प. माजी माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली. उपस्थित सर्वांनी एकमुखाने होकार दर्शवत ही मागणी लावून धरली.
गणेश चतुर्थी उत्सव जवळ येत आहे. यासाठी गणेश मूर्ती घडवण्याचे काम जोरात चालू आहे. मूर्तीकार लवकरात लवकर काम आवरण्यासाठी गडबडीत चालू आहे. मात्र दर पाच मिनिटाला विद्युत प्रवाह खंडित होत आहे. गणपतीचे रंगकाम हे वीजेवरच अवलंबून आहे. खंडीत वीज पुरवठ्यामुळेआम्हीं मूर्तिकार अडचणीत येत आहोत. वीज गेल्यावर तुमचे सगळ्यांचे फोन बंद होतात. संपर्क होत नाही. वीजेचा लपंडाव असाच चालू राहिला, तर वीज कार्यालयात गणपती मूर्ती आणून रंगकाम चालू करणार, असा इशारा मूर्तीकार यशवंत घोगळे यांनी दिला.