चालत्या कारवर कोसळले झाड

दोडामार्ग-वीजघर मार्गावर दुर्घटना : सुदैवाने चालक बचावला
Sindhudurg A tree fell on a moving car
दोडामार्ग- बीजघर मार्गावरील पाळये तिठा येथे कारवर मोठे झाड कोसळले. file photo

दोडामार्ग : एका धावत्या कारवर मोठे झाड कोसळण्याची घटना दोडामार्ग- बीजघर राज्यमार्गावरील पाळये तिठा येथे शुक्रवारी दुपारी घडली. सुदैवाने या दुर्घटनेत चालक बालंबाल बचावला. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावर धोकादायक झाडे पडण्याच्या घटनांत वाढ झाली असून, ती तोडण्याची मागणी केली जात आहे. आता तरी ही धोकादायक झाडे तोडावीत व रस्ता निर्धाक बनवावा अशी मागणी होत आहे.

दोडामार्ग वीजघर राज्यमार्गावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे आहेत. या मार्गावरील आंबेली येथे बारा दिवसांपूर्वी मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळी पुन्हा आंबेली येथे त्याच ठिकाणी पुन्हा मोठे झाड विद्युत वाहिन्यांसह रस्त्यावर कोसळले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झालाच, परंतु, वाहतुकही काही काळ ठप्प झाली. यावेळी कामावर जाणाऱ्यांची गैरसोय झाली. त्यातच जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे झाड बाजूला करण्यास कोणीही पुढे येत नव्हते. अखेर काही स्थानिकांनी पुढाकार घेत अखेर झाड बाजूला करून वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला. यावेळी वाहनचालक व प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शुक्रवारी दुपारी पुन्हा एका धावत्या कारवर झाड कोसळले. मात्र यावेळी कारचालक सुखरूप बचावला. गोव्यातील एक व्यक्ती तिच्या आलिशान कारने शुक्रवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास दोडामार्ग वीजघर राज्य मार्गावरून बेळगावला जात होता. पाळये तिठा येथील तीव्र वळणावर त्याची कार आली असता तेथील एक मोठाले झाड अचानक कारवरच कोसळले. यावेळी चालक घाबरला. मात्र, प्रसंगावधान राखत त्याने कार उभी केली. या दुर्घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मार्गस्थ होणाऱ्या अन्य गाड्याही थांबल्या. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. एसटी बसही अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

स्थानिक धावले मदतीला

अपघाताची माहिती तेथील ग्रा.पं. सदस्य तथा शिवसेनेचे दोडामार्ग उपतालुकाप्रमुख मायकल लोबो यांसह अजय गवस, गोविंद भट यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाळ, कोयत्याच्या साह्याने झाड तोडून बाजूला केले. मुळस सावंतवाडी एसटी बस चालकानेदेखील याकामी मोलाचे सहकार्य केले. ते झाड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

दोडामार्ग तालुक्यातील राज्यमार्गालगत असणारे धोकादायक वृक्ष तोडण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. या हलगर्जीपणाचा शुक्रवारी एकास नाहक फटका बसला. या मोठ्या दुर्घटनेतून केवळ दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी निष्पाप जीव जाण्याची वाट पाहत आहे का? ही धोकादायक झाडे येत्या आठ दिवसांत न हटविल्यास झाडे तोडून रास्ता रोको करू.

- मायकल लोबो, शिवसेना उपतालुकाप्रमुख

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news