

ओरोस : राज्यात अपात्र रेशन कार्ड शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत योग्य ते पुरावे सादर न करणार्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. 31 मे पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. या काळात रेशन कार्डधारकांच्या घरी भेट दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी दिली.
या विशेष मोहीमेत राज्यातील प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार आहे. रेशन कार्डधारकांना त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांकडून तपासणी नमुना फॉर्म विनामूल्य उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या फॉर्मसह कार्डधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. हमीपत्रासह फॉर्म दुकानदारांकडे सादर केल्यानंतर लाभार्थ्यांना त्याची पोच मिळणार आहे.
पुरवठा विभागाकडून होणार्या छाननीत वास्तव्याचा पुरावा आणि योजनेच्या निकषानुसार सर्व कागदपत्रे असलेल्या अर्जाचा गट ‘अ’ मध्ये आणि कागदपत्रे नसलेल्या अर्जाचा गट ‘ब’ यादीत समावेश केला जाणार आहे. ‘अ’ यादीतील रेशन कार्ड सादर केलेल्या कागदपत्राला अनुसरुन योग्य त्या वर्गवारीत (अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी यादी) पूर्ववत ठेवण्यात येणार आहे. तर ‘ब’ यादीतील कार्डधारकांना 15 दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली जाणार आहे. मुदतीत पुरावे सादर न केल्यास आणखी 15 दिवसांची मुदत दिली जाईल. या काळातही पुरावे न दिल्यास रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील, खासगी कंपन्यांतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्त्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल व अशा कर्मचा-यांकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका असेल, तर ती शिधापत्रिका तात्काळ रद्द केली जाणार आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य शिधापत्रिका दिली जाणार आहे. रेशन कार्ड धारकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत रेशन धान्य दुकानदार यांचेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.