Sindhudurg News : कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील टाकीच्या जागेवरून वाद

कामाला तात्पुरती स्थगिती; कंत्राटदाराच्या सोयीसाठी रुग्णालयाच्या पार्किंगचा बळी?
Sindhudurg News
कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील टाकीच्या जागेवरून वाद
Published on: 
Updated on: 

कुडाळ : कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाच्या अग्‍निशमन यंत्रणेसाठी रुग्णालय समोरील पार्किंग जागेत पाणी साठवणूक टाकीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर काम चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी होत असल्याचा आरोप शनिवारी कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. याबाबत काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रवक्ते बाळा पावसकर व सुशील चिंदरकर यांनी रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले. सुरू असलेल्या कामामुळे लगतच्या ऑक्सिजन प्लांट शेडला धोका निर्माण झाल्याचे सांगून, पाणी साठवणूक टाकी मागील बाजूला स्थलांतर करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती अभय शिरसाट यांनी दिली.

महिला व बाल रुग्णालय अग्‍निशमन यंत्रणेच्या पाणी साठवण टाकीसाठी ३ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ३० लाख ८५ हजार ९५० रूपये मंजूर झाले. महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा (एमजीपी) यांच्या निष्काळजीपणामुळे गेली दोन वर्षे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. एमजीपीच्या माध्यमातून होत असणाऱ्या पाणी साठवण टाकीच्या फाउंडेशनसाठी जो खड्डा खोदण्यात आला आहे, तो ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीच्या जवळ असल्याने ऑक्सिजन प्लांटच्या पायऱ्यांचा काही भाग या खड्ड्यामध्ये कोसळला आहे. तर ५० लाख रुपये खर्च केलेल्या इमारतीला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. याबाबत, कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिला बालकल्याण वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग यांचे लक्ष वेधण्यात आले.

रुग्णालयाच्या मागे जागा उपलब्ध असतानाही एमजीपीने भविष्यात महिला बाल रुग्णालयाच्या अडचणीचा विचार न करता कंत्राटदाराला सोप्या पद्धतीने काम करायला मिळावे यासाठी ही जागा निवडली आहे तसेच रुग्णालय समोरील पार्किंगची जागा कायमस्वरूपी नष्ट झाली आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने अभय शिरसाट यांनी केला. सोमवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एमजीपीच्या अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन नवीन जागा निवडण्याचे निश्चित करण्यात आले. तोपर्यंत कत्राटदारांने सदरील काम बंद ठेवावे असे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग यांनी दिल्याची माहीती श्री. शिरसाट यांनी दिली. यावेळी शिवसेना (उबाठा) शहर संघटक सुशील चिंदरकर, तालुका प्रवक्ते बाळा पावसकर, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तरबेज शेख आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.