

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायंगणीवाडी) येथील 17 वर्षीय कॉलेज युवती दीक्षा तिमाजी बागवे हिच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित कुणाल कृष्णा कुंभार (वय 22, रा. गोठोस, मांडशेतवाडी) याची पोलिस कोठडी सोमवारी (6 ऑक्टोबर रोजी) संपत आहे. ही पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच दीक्षाची सोन्याची चेन अद्याप मिळालेली नसून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती कुडाळ पोलिसांकडून देण्यात आली.
2 ऑगस्ट 2025 पासून बेपत्ता असलेल्या दीक्षा हिचा खून झाल्याचे समोर आले. महाविद्यालयात शिक्षण घेणार्या दीक्षाचा खून एकतर्फी प्रेमातून तिचाच मित्र संशयित कुणाल कुंभार याने केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्याने दीक्षाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह वाडोस येथील निर्जन शेतमांगरात लपवून ठेवला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित कुणाल याला 1 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.
न्यायालयाने त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान खुनानंतर कुणालने खुनासाठी वापरलेली दोरी, दीक्षाचे दप्तर, मोबाईल, ओळखपत्र अशा तब्बल 16 वस्तू पोलिसांनी आतापर्यंत हस्तगत केल्या आहेत. मात्र तिची सोन्याची चेन अद्याप मिळालेली नाही. पोलिसांकडून चेनचा शोध घेतला जात आहे.