

ओरोस : अनुसूचित जाती यादीतील नोंद क्रमांक 36 मधील ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ असे बदल करून तसा शासन आदेश काढावा, अशी मागणी जिल्हा धनगर समाज बांधवांनी केली आहे. सोमवारी याबाबत धनगर बांधवांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लेखी निवदेन दिले. शासनाने याबाबत दखल न घेतल्यास केंद्र आणि राज्य शासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला.
संघटनेचे बापू खरात, सुरेश झोरे, दीपा ताटे, अमोल जंगले, संतोष साळस्कर, मंदार वरख, विलास जंगले, राजा बुटे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. या बाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाचा शासन आदेश काढावा, राज्यात ‘धनगड’ नावाची कोणतीही जात- जमात अस्तित्वात नाही, जे आहेत ते सर्व ‘धनगर’ आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हीबाब मान्य केली आहे. यामुळे आरक्षण यादीत अस्तित्वात नसलेल्या जात जमात समाविष्ट करू शकत नाही. महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागाने 10 ऑक्टोंबर 2024 रोजी एक शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयात ‘धनगड’ या शब्दाऐवजी ‘धनगर’ असे वाचावे असे म्हटले आहे.
यावरून स्पष्ट होते की राज्य सरकारला असा शासन आदेश काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती यादीतील नोंद क्रमांक 36 मधील ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ असे वाचावे, असा शासन आदेश तात्काळकाढावा. अशी मागणी धनगर बांधवांनी केली आहे. अन्यथा शासनाने काढलेल्या आदेशाविरुद्ध विरोधात समाज बांधव तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दिला आहे.