Devrai eco-initiative: पर्यावरण रक्षणासाठी ‘देवराई’

Devrai for environment protection: चिपळूण उपविभागात नव्याने होणार तीन देवराया
World Environment Day
जागेची पाहणी करताना मकरंद अनासपुरे.pudhari photo
Published on
Updated on
समीर जाधव, चिपळूण

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात येतात. निसर्ग संरक्षणाची शपथ घेतली जाते. शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी हा पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यावर्षी राज्य शासनाने महसूल प्रशासनाला प्रत्येक तालुक्यात एक देवराई निर्माण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या अनुषंगाने चिपळूण उपविभाग अंतर्गत तीन देवराया नव्याने निर्माण केल्या जाणार आहेत. येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, त्यातील पहिल्या देवराईचे शहरालगतच्या कळंबस्ते येथील रेल्वे फाटकालगत असणार्‍या पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय जागेत ही देवराई उभी राहणार आहे. त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा शुभारंभ पर्यावरण दिनीच नागरिकांच्या उपस्थितीत होणार आहे.

शासन ‘झाडे लावा झाडे जगवा’ यासाठी सातत्याने आवाहन करीत आहे. झाडे तोडू नका, पाणी अडवा-पाणी जिरवा यासाठीही प्रचार-प्रसार सुरू आहे. या अनुषंगाने चिपळूण उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी आपल्या दुष्काळी भागातील गावात प्रायोगिक तत्त्वावर एक भव्य अशी देवराई उभी केली आहे. गावातील सुशिक्षित व नोकरदार मित्रांनी एकत्र येत आर्थिक योगदानातून ही देवराई उभी करण्यात आली आहे.

या देवराईमध्ये शंभरहून अधिक प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत आणि लोकसहभागातूनच या देवराईच्या वार्षिक नियोजनाचा खर्च उचलला जात आहे. त्यातूनच प्रांताधिकारी लिगाडे यांना ही संकल्पना सूचली. त्यात शासकीय आदेश आल्याने मुळातच त्यांना या विषयी रूची असल्याने त्यांनी चिपळूण उपविभागअंतर्गत गुहागर आणि चिपळूण या दोन तालुक्यांत तीन देवराया उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबस्ते तसेच मांडकी आणि गुहागर तालुक्यातील चिखली या ठिकाणी या देवराया नव्याने निर्माण केल्या जाणार आहेत.

चिपळूण येथे कळंबस्ते रेल्वे फाटकानजीक साडेतीन एकरामध्ये ही देवराई निर्माण होणार आहे. पर्यावरणदिनी सकाळी 8 वा. वृक्ष लागवडीचा समारंभ होणार आहे. यावेळी श्रमदानासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुभारंभाच्या वेळीच 149 प्रजातींच्या 1 हजार 252 वृक्षांची लागवड यावेळी करण्यात येणार आहे.

तापमानवाढ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळे, भूकंप, जलप्रलय, गारपीट अशाप्रकारच्या आपत्ती येत आहेत. यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. वातावरणीय बदलाचा मानवावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या पर्यावरणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाद्वारे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्ष लागवड हा नामी उपाय आहे. तसेच जैवविविधतेचे जतन करण्यासाठी देवराया व घन वने तयार करणे प्रभावी ठरणार आहे.

राज्यात मानवनिर्मित देवराया व घन वने निर्माण करण्यासाठी शासनाने वनीकरण क्षेत्रात अनुभव असणार्‍या पुणे येथील देवराई फाऊंडेशन या संस्थेद्वारे प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक देवराई व घन वन तयार करावे यासाठी सूचना केली आहे. देवराई उभारण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती व रोपे देवराई फाऊंडेशनमार्फत पुरविण्यात येणार आहेत. त्यातूनच चिपळूण उपविभागात तीन देवराया उभ्या राहात आहेत.

फार पूर्वीपासून कोकणामध्ये ग्राम देवस्थानांच्या माध्यमातून गावोगावी देवराया उभ्या केलेल्या होत्या. या देवरायांमध्ये जुनाट आणि दुर्मीळ अशी झाडे पाहायला मिळत होती. ग्रामदेवतेच्या आदेशाने या झाडांची जपणूक केली जात होती. मात्र, मध्यंतरी वादळ; किंवा ग्रामदेवतांच्या मंदिरासाठी देवरायांची तोड करून त्या लाकडातून मंदिरांची उभारणी झाली व अनेक देवराया नष्ट झाल्या.

देवराया गावोगावी हिरव्यागार व्हाव्यात ः मकरंद अनासपुरे

कळंबस्ते या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची साडेतीन एकर जागा पडीक होती. या ठिकाणी झाडे-झुडपे, कचरा होता. ही जागा प्रांताधिकारी लिगाडे यांनी हेरून जागेची साफसफाई केली. त्यानंतर या जागेवर भराव करण्यात आला. वाशिष्ठीतून काढण्यात आलेला गाळ या ठिकाणी टाकण्यात आला आणि जागेचे सपाटीकरण झाले. त्यानंतर झाडे लावण्यासाठी नियोजन करण्यात आले. एका प्रकारची चार ते सहा झाडे या देवराईमध्ये लावण्यात येणार आहेत. यामध्ये फुलं, फळे, दुर्मीळ झाडे, मसाला पिके आदी प्रकारची झाडे असणार आहेत. या शिवाय लाकडी बेंच, गार्डन, देवराईत फिरण्यासाठी मोकळी जागा असणार आहे. या जागेला पूर्ण कंपाऊंड वॉल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news