Sindhudurg News| ‘समुद्र आपला श्वास... त्याची स्वच्छता आपला संकल्प!’

देवगड तालुक्यातील १२ किनारे स्वच्छ ठेवण्याचे प्रमोद कामत यांचे आवाहन
Sindhudurg News
देवगड : बीच स्‍वच्छता अभियान उद्घाटनप्रसंगी बोलताना जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत. सोबत अपूर्वा बासूर, जयप्रकाश परब, अजित गोगटे आदी.
Published on
Updated on

देवगड : समुद्र हा केवळ पर्यटनाचा आणि निसर्गसौंदर्याचा ठेवा नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व १२ समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची आहे. समुद्रकिनारे, पाणवठे, विहिरी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेत सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. देवगड येथे आयोजित बीच स्वच्छता अभियानाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ५.०’ या अभियानांतर्गत शनिवारी देवगड समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोद कामत यांनी स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर न सोपवता नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घेण्याची गरज व्यक्त केली. समुद्रकिनाऱ्यावर येणारा प्रत्येक पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांनी स्वच्छतेची काळजी घेतली, तर देवगडचे समुद्रकिनारे अधिक सुंदर, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील, असा संदेश त्यांनी दिला.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, माजी आ. अजित गोगटे, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, देवगड सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जि. प. सदस्य देवदत्त कदम, पं. स. सदस्य सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, न. पं. मुख्यधिकारी हरिदत्त माने, गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, सेवाभावी संस्था ग्रामस्थ तसेच देवगड कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर म्हणाल्या, १२ ते १९ सप्टेंबर या कालावधीत ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ५.०’ अभियान विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या अभियानाचे सुंदर नियोजन करण्यात आले असून, स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व संस्था, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news