

देवगड : समुद्रात वादळसदृश वातावरण तसेच अतिवृष्टी आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या असून यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकांचा समावेश आहे. दोन दिवस वादळसदृश वातावरण असल्याने मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.
२८ सप्टेंबरपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने किनारपट्टी भागाला झोपडले असून समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाले आहे. तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, अशा सुचना हवामान विभागाने मच्छिमार संस्था व मच्छिमारांना दिल्या आहेत. या पार्श्वभुमीवर रविवारी सायंकाळपासूनच मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकांनी सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे. यामध्ये गुजरातमधील १०५ तसेच रत्नागिरी ३ व स्थानिक नौकांबरोबच मालवण, वेंगुर्ला येथील सुमारे दीडशेहून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत वादळसदृश वातावरण व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात या व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र, वातावरण पोषक नसल्याने सुरूवातीचे काही दिवस धिम्यागतीने व्यवसाय सुरू झाला. गणेशचतुर्थीनंतर व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. पर्सनेटला बांगडा, यांत्रिकी नौकांना काळा मासा तर न्हैयला गेजरी व कांडाळी मच्छिमारीला बांगडा असे मासळे मिळत होते. मात्र, समाधानकारक व्यवसाय झाला नाही. असे स्थानिक मच्छिमार तथा देवगड फिशरमेन्स संस्थेचे चेअरमन द्विजकांत कोयंडे व विकास कोयंडे यांनी सांगितले. सप्टेंबरपासून या व्यवसायाला गती येते. मात्र, वादळसदृश व पावसाळी वातावरणाचा या व्यवसायावर परिणाम झाला असून सध्या हा व्यवसाय ठप्प झाला आहे. असे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. शेकाडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्याने देवगड बंदर गजबजले आहे.