देवगड -जामसंडे नळयोजनेला फुटीचे ग्रहण

Devgad water crisis : शहरवासीयांवर पाणी विकत घेण्याची वेळ
Devgad water pipeline burst
या ना त्या कारणाने देवगड-जामसंडे शहरवासीयांचा पाणीपुरवठा बंद पडत असून दहिबांव जलवाहिनी फुटणे नित्याचेच झाले आहे. गावकर बाग, भिडे स्टॉप खाकशी उतार येथे फुटलेली जलवाहिनी. (छाया : वैभव केळकर)
Published on
Updated on

देवगड ः देवगड नळयोजनेची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने देवगड व जामसंडे शहराचा पाणीप्रश्न नागरिक व प्रशासनासाठी डोकेदुखी बनला आहे. सध्या टंचाई काळ विचारात घेऊन न. पं. प्रशासनाने दोन्ही शहरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ पाईपलाईन वरचेवर फुटत असल्याने दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता चार-चार दिवसांनी होत असल्याने शहरवासीयांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

देवगड नळयोजना दुरूस्तीसाठी 9 कोटी 21 लाख रूपये मंजूर झाले आहेत. मात्र हे काम अद्याप निविदा प्रक्रियेत आहे. नळयोजनेची जीर्ण झालेली पाईपलाईन वरचेवर फुटणे नित्याचेच झाल्याने देवगड जामसंडेवासीयांना वारंवार पाण्याचा गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.

देवगड-जामसंडे शहरांंना पाणीपुरवठा करणार्‍या दहिबांव पूरक नळयोजनेची जलवाहिनी सातत्याने फुटत असते. वर्षभरात ही पाईपलाईन फुटण्याचे किमान 10 ते 12 प्रकार घडतात. फुटलेली पाईपलाईन दुरूस्तीसाठी किमान 4 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागतो. ऐन पावसाळ्यातही ही समस्या वारंवार उद्भवते. उन्हाळ्यात याची दाहकता तीव्रतेने जाणवते. यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी होत असल्याने ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीनुसार पाईपलाईन फुटीच्या घटना सुरूच असतात.

मे महिन्यातील टंचाई लक्षात घेऊन न. पं. ने दोन दिवस आड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. मात्र पाईपलाईन फुटत असल्याने हा पाणीपुरवठा आता चार ते पाच दिवसांनी होत आहे. यामुळे देवगड-जामसंडेवासीयांना टंचाई समस्येला सामोरे जावे लागत आहे.

नळयोजना दुरुस्ती काम अद्याप टेंडर प्रक्रियेत

नळयोजना दुरूस्तीसाठी 9 कोटी 21 लाख रूपये मंजूर झाले; मात्र ते काम अद्याप टेंडर प्रक्रियेतच असल्याचे समजते. यामुळे जलवाहिनी पूर्णत: बदलणे, पंपींग यंत्रणा आदी कामांचा यात समावेश आहे. मात्र ते काम अद्याप प्रक्रियेतच असल्याने पावसाळ्यात अथवा पावसाळ्यानंतरच त्याला मुहूर्त मिळेल, अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत जीर्ण झालेली पाईपलाईन फुटणे नित्याचेच झाले असल्याने ऐन टंचाईकाळात देवगड व जामसंडेमधील नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ना. राणेंकडून कार्यवाहीचे आश्वासन

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी याप्रश्नी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news