

देवगड : वसुबारस सणापासून दीपावली सणाला सुरूवात झाली. मात्र वसुबारसच्या रात्री विजेच्या लपंडावाने देवगडवासीय त्रस्त झाले. सर्वांच्या घरी कंदील, तोरणांनी विद्युतरोषणाई केलेली असताना रात्री वीज गायब झाल्याने ‘दिवाळीची सुरूवात अन् देवगड काळोखात’ अशी अवस्था दिवाळीच्या पहिल्याच दिवशी देवगडवासीयांची झाली. याबाबत सोशल मिडीयावरूनही नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. वरचेवर देवगड फिडर समस्याग्रस्त होतो,याकडे महावितरणने गाभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
देवगड शहरातील वीजपुरवठा शुक्रवारी वसुबारस दिवशीच रात्री खंडीत झाला. यासाठी फिडर नादुरूस्त असल्याचे कारण सांगण्यात आले.दीपावलीचा पहिलाच दिवस सर्वत्र विद्युतरोषणाई करण्यात आली होती, मात्र रात्री वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले. रात्री 10 वा. पर्यंत वीजेचा लपंडाव सुरू होता. देवगड शहराला वीज पुरवठा करणारा फिडर वारंवार नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढले असून या समस्येवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. लाईट गेल्यावर सोशल मिडीयावर नागरिकांकडून विविध प्रतिक्रियाही उमटल्या.
दरम्यान शनिवारी धनत्रयोदशी दिवशी स. 11.30 वा. महत्वाच्या कामानिमित्त एक तासासाठी देवगड फिडर बंद करण्यात आला आहे असा संदेश महावितरणकडून देण्यात आला. ऐन दिवसाळीत उत्साहाचे वातावरण असताना तसेच नागरिकांबरोबरच व्यावसायिकांनाही वीजपुरवठा सुरळीत राहणे आवश्यक असताना दीपावलीच्या पहिल्याच दिवसापासून वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महावितरणने दीपावलीमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत व देवगड फिडर वरचेवर नादुरूस्त होतो त्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.