Devgad Robbery : देवगडमध्ये भरदिवसा घरफोडी! कुलूपाची चावी शोधून चोरट्याने लांबवले ५ लाखांचे मंगळसूत्र

वाडातर येथील घटना
house burglary Case
house burglary Case pudhari file photo
Published on
Updated on

देवगड : तालुक्यातील वाडातर येथे घरफोडीची घटना समोर आली आहे. घरमालक वृद्ध महिला खाडीवर कालवे काढण्यासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराबाहेर लपवून ठेवलेली चावी शोधून घरात प्रवेश केला. व बेडरूममधील कपाटातून सुमारे ५ लाख रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना १ जून रोजी पहाटे ४:३० ते सकाळी ७:३० च्या सुमारास घडली असून याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चोपडेकर या १ जून रोजी पहाटेच्या सुमारास वाडातर खाडी येथे कालवे व मूळे काढण्यासाठी गेल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या राहत्या घराच्या पुढील मुख्य दरवाज्याला कुलूप लावून त्याची चावी तेथेच ठेवली होती. कालवे काढून झाल्यानंतर काही वेळाने त्या घरी परतल्या. तेथे नियमित जागी ठेवलेल्या चावीने त्यांनी घराचा मुख्य दरवाजा स्वतः उघडत घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना बेडरूममधील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. तेथील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटामधील काळे मणी व पेंडल असलेले सोन्याचे पाच तोळे वजनाचे व सुमारे पाच लाख रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रतिभा चोपडेकर यांनी या घटनेची फिर्याद गुरुवारी देवगड पोलीस स्थानकात दाखल केली. फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देत देवगड पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, हवालदार आशिष कदम आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. घटनेचा तपास हवालदार आशिष कदम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news