

देवगड : दहिबांव नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा ऐन पावसाळ्यातही गंभीर झाला आहे.पाईपलाईन फुटण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले असून यामुळे देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा सध्या बंद आहे.
दहिबांव नळयोजनेची पाईपलाईन फुटणे नित्याचेच झाले असून दहिबांव नळयोजनेची मुख्य जलवाहीनी लिकेज झाल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे नळग्राहकांना पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
धुव्वाधार पडलेल्या पावसामुळे मुबलक पाणीसाठा असूनही पाईपलाईन फुटण्याचे सत्र सुरूच असून यामुळे देवगड व जामसंडेवासियांचा पाणीपुरवठा ऐन पावसाळ्यातही गंभीर झाला आहे.
पावसाळ्यात देवगड जामसंडेवासियांना पाणीपुरवठा होत असलेल्या दहिबांव येथील अन्वनपूर्णा नदीच्या जलस्रोतामधील पाण्याचा साठ्यातही भरपूर वाढ झाली. पाण्याचा पातळीत वाढ झाल्यामुळे आता पाणीपुरवठा सुरळीत होईल, दोन दिवस आड करून सुरू केलेला पाणीपुरवठा पहिल्याप्रमाणे एक दिवस आड करून करण्यात येईल असे देवगड जामसंडेमधील नागरिकांना वाटत होते मात्र त्यांचा या अपेक्षेचा भंग झाला असून ऐन पावसाळ्यातही जलवाहीनी फुटण्याची समस्या उद्भवल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.