Sindhudurg Rain: वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्यात १,०५० मिमी पावसाची नोंद
Sindhudurg Rain
Sindhudurg Rain
Published on
Updated on

देवगड : देवगड तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठा तडाखा दिला. तालुक्यातील कुणकेश्वर, मणचे आणि शिरवली परिसरात घरांचे तसेच झाडांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांच्या छपरांवरील सिमेंट पत्रे उडाली, भिंती कोसळल्या, तर झाडे घरांवर कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली असली, तरी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्यात पावसाने १,०५० मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. रविवारी एकाच दिवसात १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कुणकेश्वर येथील सत्यवान दत्ताराम कुणकेश्वरकर यांच्या घरावरील सिमेंट पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्यामुळे उडून नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. मणचे येथील गोविंद तुकाराम गुरव यांच्या घराची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच शिरवली येथील मंगेश भिकाजी कदम यांच्या घरावर सागाचे झाड कोसळल्याने छपराचे नुकसान झाले. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित पंचनामे लवकरच सादर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सलग सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news