

देवगड : देवगड तालुक्यातील वरेरी- कुळये सडेवाडीनजीक चिरेखाणीवर परप्रांतीय कामगार कृष्णकुमार जुगराज यादव (20, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्या डोक्यात ट्रकमधील व्हील पान्याने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला त्याचा चुलत भाऊ रितीक दिनेश यादव (20, मूळ रा. मध्यप्रदेश) या संशयिताला देवगड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम जाधव यांच्या जागेत उमेश गवाणकर यांची चिरेखाण आहे.
या चिरेखाणीवर कृष्णकुमार व संशयित रितीक हे दोघे कामास होते. मंगळवार 15 जुलैच्या रात्री या दोघांमध्ये एका शुल्लक कारणावरून वाद झाला व त्या वादाचा राग मनात ठेवून संशयित रितीक यादव याने कृष्णकुमार याच्या डोक्यात ट्रकमधील व्हिल पान्याने प्रहार करून त्याचा खून केला. ही घटना 16 जुलै रोजी सकाळी 6 वा.च्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी चिरेखाणीचे मुकादम विजय शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयित रितीक यादव याला तात्काळ अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने संशयिताला 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने संशयित रितीक यादव याला गुन्हा देवगड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.