

दोडामार्ग : आमसभेच्या सुरुवातीलाच झालेला गोंधळ ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून इथे आलेल्या मुलाने गदारोळ घालण्यास सुरुवात केली. ज्याला सभाशास्त्र ज्ञात नाही, त्या मुलाची ही पहिलीच सभा आहे. प्रास्ताविक करीत असताना मी त्याला तुम्हीं खाली बसा नंतर तुमच्या विषयावर बोलू असे सांगूनही त्याने ऐकले नाही. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि गोंधळ उडाला. घडलेल्या घटनेची मी स्वतःहून दिलगिरी व्यक्त करून सभेचे कामकाज चालू केले. आणि पुढील सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. गदारोळानंतर त्या मुलाला बोलण्याची चारवेळा संधी देण्यात आली आणि तो बोलला देखील, अशी प्रतिक्रिया आ. दीपक केसरकर यांनी दिली.
लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
तर याबाबत बोलताना रविकिरण गवस म्हणाले, आम सभेमध्ये प्रश्न उपस्थित करीत असताना झालेला गदारोळ हा आ. दीपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांमुळेच झाला. आमसभेबाबत पंचायत समितीने पत्र काढले आहे. आणि त्या लेटर पॅडवर ज्यांची सही आहे. त्या गटविकास अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला असताना त्याच बिडीओंच्या सहीने आमसभा कशी होते? असा प्रश्न विचारला म्हणून केसरकरांचे कार्यकर्ते माझ्यावर तुटून पडले आणि माझ्या अंगावर धाऊन आले. त्यांचे अवैध धंदे आहेत, त्यांची काही कारस्थाने आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना सांभाळून घेण्यासाठी माझा आवाज दाबण्याचा त्यांनी हा प्रयत्न केला आहे. ही लोकशाही राहिलेली नाही ही हुकूमशाही झालेली आहे. त्यामुळे या प्रकाराचा आपण निषेध करतो.
संविधान पायदळी तुडविले
आ. दीपक केसरकर यांनी जरी सबुरीने घेत असल तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरायला पाहिजे होते. प्रदीर्घ काळानंतर लावण्यात आलेलेली आमसभा पार पाडावी म्हणून आम्ही देखील सबुरीने घेतलं. असे प्रकार भविष्यात कधीही खपऊन घेतले जाणार नाहीत. असा प्रकार करून त्यांनी संविधान पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना भेट म्हणून संविधानाची एक प्रत देणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी सांगितले.
आज झालेल्या आम सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातघाईवर येऊन धक्काबुक्की करण्याचा जो प्रकार केला तो अत्यंत निंदनीय आहे. आपले विचार मांडण्याची स्वतंत्रता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. आणि ही स्वतंत्रता भंग करण्याचे काम शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. दरानी अत्यंत चांगल्या प्रकारे ही सभा सांभाळली होती असा असतानाही आमदारांना या घटनेच दुःख झालं. त्यामुळेच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. या घडलेल्या प्रकाराची आम्हीं विरोधी पक्षाचे पदाधिकारी निषेध करतो असे उबाठा सेनेचे तालुकाध्यक्ष संजय गवस यांनी सांगितले.
आमसभेचे प्रास्ताविक करीत असताना आमदार केसरकर यांना रोखण्याचा प्रयत्न चार ते पाच वेळा करण्यात आला. सभा अध्यक्षांनी सांगूनही त्यांनी एकूण न घेतल्याने आमच्या युवा कार्यकर्त्यांकडून झालेला प्रतिकार स्वाभाविक आहे. अकरा वर्षांनी लागलेल्या आम सभेतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं अशी अध्यक्ष यांची भूमिका होती. आमदार दीपक केसरकर यांच्या जागेवर कोणी दुसरे अध्यक्ष असते तर त्यांनी त्याला थेट बाहेर घालवलं असत. आमसभा उध्वस्त करण्याच, गदारोळ करण्याच षडयंत्र विरोधकांच होत. असे स्पष्ट संकेत आम्हाला दिसत दिसत होते. त्याच उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी चोख दिलेल आहे. रविकिरण गवस यांनी केलेलं अवैध धंद्याचे आरोप फेटाळून लावत आमचा एकच धंदा आहे तो म्हणजे ठेकेदार. नदीला घातलेला बांध हा अनेक वर्षापासून तिथे घातला जातो. पुण्याला राहणाऱ्या माणसाला गावातील परिस्थिती कशी समजणार. बांध घालण्यासाठी नाहरकत दाखला ग्रामपंचायतीचा असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना शिंदेगट उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर दिले.