Deepak Kesarkar : सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेला विशेष दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न

आ. दीपक केसरकर : सावंतवाडी येथे 'जनता आरोग्य दरबारात' कार्यक्रम
Deepak Kesarkar
जनता आरोग्य दरबाराचे उद्घाटन करताना आ. दीपक केसरकर. शेजारी दादा साईल, प्रितेश राऊळ, एन. बी. रेडकर आदी.
Published on
Updated on

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय पदे भरण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेचा दर्जा सुधारण्यासाठी विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर जिल्ह्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन आ. दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित 'जनता आरोग्य दरबारात' ते बोलत होते.

वैद्यकीय पदांसाठी विशेष तरतूद

आ. केसरकर म्हणाले, जिल्ह्यात ५० टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. सावंतवाडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून डॉक्टरांना अतिरिक्त पगार देऊन त्यांची नेमणूक करता येईल, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांना सुपूर्द केला आहे. तसेच, उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सुविधेवर भर देत, आमदार निधीतून आणखी दोन डायलिसिस युनिट्ससाठी तत्काळ पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागणार

गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत बोलताना केसरकर म्हणाले, सरकार आणि राजघराण्याकडून जागेबाबत निर्णय झाला असून केवळ काही स्वाक्षऱ्या बाकी आहेत. येत्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयात विशेष बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच, उपजिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन वास्तू उभारण्यासाठी बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नगरपालिकेत 'आयुष'ची ओपीडी

जागेअभावी उपजिल्हा रुग्णालयात 'आयुष'ची ओपीडी सुरू करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीत ही ओपीडी सुरू करण्यासाठी नगराध्यक्षांशी चर्चा झाली असून, लवकरच ती कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे

उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटींचा निधी मंजूर असतानाही कामाच्या संथ गतीबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. "कंत्राटदार लॉबी कामे वेळेत पूर्ण करत नाही," असा आरोप करत रुग्णालयात पेस्ट कंट्रोल करण्याच्या सूचनाही त्यांनी बांधकाम विभागाला दिल्या.या आरोग्य दरबाराला जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, पंचायत समिती सभापती सुस्‍मिता जाधव, समन्वयक एन.बी. रेडकर, डॉ. धनंजय काकडे, डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रा. सुभाष गोवेकर, नगरपरिषद आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती प्रतिक बांदेकर,बाल कल्याण समिती सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका मोहिनी मडगावकर, ॲड. ओंकार तुळसुलकर, रवी जाधव, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, पत्रकार शेखर सामंत, विनोद शेंडे, शकुंतला भालेराव, रवींद्र ओगले व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. धनंजय काकडे, डॉ. जयेंद्र परुळेकर,आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल,जनता आरोग्य दरबाराचे समन्वयक एन.बी. रेडकर व मान्यवरांनी यावेळी विचार मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news