

सावंतवाडी : रोहित आर्यने जी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही संकल्पना राबवली होती त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र दरम्यानच्या काळात रोहित आर्यने वेबसाईट काढून मुलांकडून काही पैसे वसूल केले. हे नेमके पैसे किती वसूल केले आणि मुलांचे पैसे परत कधी करणार, याची माहिती रोहित आर्यने न दिल्यामुळे त्यांचे बिल पेंडिंग होते. शिवाय 2 कोटींची रक्कम ही त्याला वैयक्तिक नव्हे, तर त्याची संकल्पना राबविण्यासाठी होती, असे मत माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, मुलांना ओलीस ठेवणे चुकीचे आहे. मी सध्या शिक्षणमंत्री नाही; परंतु मी मुंबईत असतो, तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो आणि या प्रकरणात लक्ष घातले असते, असेही ते म्हणाले.
मुंबईत पवई येथे रोहित आर्य याने आपल्या बिलासाठी 17 मुलांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. ओलीस ठेवलेल्या मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर रोहित आर्य याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. रोहित आर्य याने जो प्रकल्प राबवला तो तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या काळात राबवला होता. केसरकर यांच्या बाजूला बसलेल्या रोहित आर्यचे छायाचित्रही सर्व मिडियावर व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी दौर्यावर असलेले आमदार केसरकर यांना पत्रकारांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीचे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी याबाबतचा खुलासा केला.
आ. केसरकर म्हणाले, रोहित आर्य यांची स्वच्छता मॉनिटरची संकल्पनेसाठी आम्ही शिक्षण खात्याकडून त्यांना परवानगी दिली होती. यावेळेला मात्र 2 कोटींची तरतूद केली होती, ती त्यांना देण्यासाठी नाही तर ती संकल्पना राबविण्यासाठी केली होती. परंतु दरम्यानच्या काळात वेबसाईट तयार करून त्यांनी मुलांकडून पैसे जमा केले. त्यामुळे ते पैसे मुलांकडून त्यांनी किती वसूल केले, त्याची माहिती द्यावी आणि ते परत करावेत, त्यानंतर त्याचे बिल द्यावे असे ठरलेले होते. ती पूर्तता रोहित आर्य यांच्याकडून झाली नाही. त्यामुळे त्यांनी राबविलेल्या प्रकल्पाची बिले पेंडींग आहेत. अनेक ठेकेदारांची बिले पेंडींग असतात, विविध कामांची बिले पेंडींग असतात, इमारतींची बिले द्यायची असतात. परंतु कोणी असा निर्णय घेत नाही. मुलांना काही झाले असते तर आम्ही स्वतःला माफ करू शकलो नसतो. पोलिसांच्या मॅटरमध्ये आम्ही लक्ष घालू शकत नाही. पोलिस योग्य ती कारवाई करतील असा विश्वासही आ. केसरकर यांनी व्यक्त केला आहे.