Sindhudurg News : सिंधुदुर्गात भातशेतीला उतरती कळा!

यंदा केवळ ३७ हजार हेक्टरवर लागवड : हजारो हेक्टर शेती पडीक
Paddy Cultivation
भात शेती.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

प्रमोद म्हाडगुत

सिंधुदुर्ग : हिरवीगार भातशेती, डोक्यावर मोरपिसांसारखा सजलेला सह्याद्री, पावसाच्या सरींनी डोलणारी भातखाचरे आणि शेतशिवारात फिरणारी बैलाची औते, आता बदलत्या काळानुसार ट्रक्टर.. हीच सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरी ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र झपाट्याने बदलत आहे. कोकणातील शेतकऱ्यांचे प्रमुख आणि पारंपरिक पीक असलेला भात आता शेतातून हळूहळू गायब होऊ लागला आहे. शेतीयोग्य जमिनी मोठ्या प्रमाणावर पडीत राहत असून, भात लागवडीचे क्षेत्र सातत्याने घटत आहे. कृषी विभागाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष ग्रामीण परिस्थिती यामधील तफावत पाहता सिंधुदुर्गच्या कृषी क्षेत्रासमोर गंभीर संकट उभे ठाकल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहिती नुसार सिंधुदुर्गचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५ लाख ३ हजार ९५० हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख १२ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. हंगामी पिकांखाली ६५ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र असून त्यात खरीप पिकांचा सर्वाधिक वाटा आहे. फळबागांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्षात शेतांमध्ये दिसणारे चित्र यामध्ये मोठी दरी आहे.

या वर्षी जिल्ह्यात सुमारे ५७ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ३७ हजार हेक्टर क्षेत्रावरच भात लागवड झाली आहे. लागवड अद्याप सुरू असल्याने हे क्षेत्र काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असली तरी हजारो हेक्टर जमीन पड राहण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या कमी क्षेत्रावर भात लागवड झाल्याचे यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते. भातशेती घटण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बदलती सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती. पूर्वी गावागावांत शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ सहज उपलब्ध होत असे. लावणी, नडणी आणि कापणीच्या कामासाठी संपूर्ण गाव एकत्र येत असे. परंतु शिक्षण, रोजगार आणि चांगल्या जीवनमानाच्या शोधात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, गोवा आणि इतर शहरांकडे स्थलांतरित झाली. त्यामुळे गावांमध्ये वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकच उरले असून शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

मजूर उपलब्ध झाले तरी त्यांची मजुरी दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात बियाणे, खते, कीडनाशके, इंधन आणि वाहतूक खर्चही वाढल्याने भातशेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे भाताला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहेत. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. काहींनी शेतीचे क्षेत्र कमी केले, तर काहींनी शेती करणे बंद केले आहे.

सिंधुदुर्गातील भातशेतीसमोरील आणखी एक मोठे संकट म्हणजे वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये रानडुक्कर, गवे, माकडे आणि काही भागांत हत्तींचा वावर वाढला आहे. हे प्राणी रात्रीच्या वेळी शेतात घुसून उभे पीक उद्ध्वस्त करतात. अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट काही तासांत वाया जातात. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून जात आहेत. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून भरपाई दिली जाते. मात्र, ती मिळविण्याची क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत मिळणारी अल्प भरपाई यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान सहन करण्यापेक्षा शेती करणेच बंद केले आहे. जंगलालगतच्या अनेक गावांमध्ये शेती मोठ्या प्रमाणात पडीक असल्याचे चित्र आहे.

रेशनवर मोफत मिळणारे धान्य हे एक कारण...

भातशेती घटण्यामागे आणखी एक महत्वाच कारण म्हणजे, सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत किंवा अत्यल्प दरात तांदूळ आणि गहू उपलब्ध होत असल्याने काही अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतःच्या गरजेपुरती शेती करणेही बंद केले आहे. पूर्वी प्रत्येक कुटुंब वर्षभरासाठी लागणारा तांदूळ स्वतः पिकवत असे. मात्र, वाढलेला खर्च, कमी उत्पन्न आणि सहज उपलब्ध होणारे धान्य यामुळे शेती करण्याची मानसिकता कमी झाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news