

मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना सज्ज झाली असून, मतदार राजाच्या आशीर्वादाने शून्यातून विश्व निर्माण करू, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. ‘आम्हाला घमेंड नाही; आमची कामगिरी आहे, पारदर्शकता आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
मालवण येथील महायुतीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दत्ता सामंत बोलत होते. जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख राजा गावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहर प्रमुख दीपक पाटकर, ममता वराडकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, आ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे उमेदवार निवडणूक प्रचारास सुरुवात करण्यापूर्वी श्रीदेव रामेश्वर मंदिरात जाऊन भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभाराची शपथ घेतील. आम्ही नगरसेवक नाही, तर जनतेचे सेवक म्हणून काम करू, शहरातील विकासकामांचा पाढा वाचत त्यांनी सांगितले की, आ. नीलेश राणे यांनी मालवणसाठी 46 कोटींची नळपाणी योजना, 2 कोटींचा अग्निशमन दलाचा निधी, 4 कोटींचे क्रीडांगण संकुल, 1.35 कोटींचा नगरोत्थान निधी अशा विविध योजना आणल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मालवण पालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी 1 कोटींचे बक्षीस मिळाले.आमची इच्छा महायुतीने एकत्र लढण्याची आहे. आम्ही महाराष्ट्रात व केंद्रातही महायुतीत आहोत. आ. नीलेश राणे, खा. नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करत आहोत. काहींना आमच्या शक्तीबद्दल शंका असेल, पण 3 डिसेंबरचा निकाल त्यांचा हा भ्रम दूर करेल, असा उपरोधीक टोला त्यांनी भाजपला लगावला.
श्री. सामंत म्हणाले, नगरपालिका म्हणजे धंद्याचे ठिकाण नाही, ते समाजमंदिर आहे. आम्ही साहेब बनून नाही, सेवक बनून त्यात जातो. आमचे ब्रीद आहे ‘80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण. येथे अहंकार नको, कारण मतदार राजा आहे,’ असे सांगत दत्ता सामंत यांनी समाजकारणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणला राज्यातील आदर्श शहर बनवण्याचे आमचे ध्येय आहे. मतदारांनी आम्हाला साथ दिल्यास पुढील पाच वर्षे पारदर्शक कारभाराची हमी आम्ही देतो, असे आश्वासनही सामंत यांनी दिले.