

कणकवली ः पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, मराठवाडा, कोकण, गोवा व बेळगाव येथेही आघाडीवर असणाऱ्या आणि लाखो वाचकांकडून वाचला जाणाऱ्या दै. ‘पुढारी’चा 87 वा वर्धापन दिन गुरुवार, 1 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुखपत्र असलेल्या दै.‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, 1 जानेवारी 2026 रोजी कणकवली येथील जिल्हा कार्यालयात सकाळी 11 वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘ आत्मनिर्भर भारत’ या विषयास अनुसरून काढण्यात आलेल्या विशेष पुरवण्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिन कार्यक्रमाला सर्व जिल्हावासीय, दै. ‘पुढारी’चे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दै. ‘पुढारी’चे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख गणेश जेठे व पुढारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.