

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे शनिवारी मध्यरात्री एक मोठी मगर महामार्गावरून पलीकडे जात असताना बिबवणे येथील तरुणांना दिसली. त्यांनी सतर्कता दाखवून ते मगरीच्या मागावर राहिले. सर्व्हिस मार्गाकडील लोखंडी रोलिंगमुळे ती पुढे न जाता साधारण पाऊण तास तेथेच थांबली. सुमारे सात फूट लांबीची ही मगर मोकळ्या जागेत असल्याने तिला पकडणे जिकिरीचे होते.
अखेर वन विभागाच्या जलद बचाव कृती दलाने स्थानिक तरुणाच्या मदतीने त्या मगरीला शिताफीने पकडले. त्यानंतर रविवारी पहाटे त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. मध्यरात्री 2.15 वा.च्या सुमारास बिबवणे गावातील प्रसाद निर्गुण, पिंट्या डेगवेकर, केदार प्रभू व सत्यवान बिर्जे कारमधून महामार्गावरून बिबवणेच्या दिशेने येत होते.
याच दरम्यान, बिबवणे हायस्कूलपासून काही अंतर अलीकडे महामार्गावरून पलीकडे एक मोठी मगर जातांना त्यांना दिसली. या तरुणांनी कार थांबवत मगरीची टेहाळणी केली. मगर कर्ली नदीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होती. परंतु सर्व्हिस मार्गावरील रोलिंग मुळे तिला पुढे जाणे शक्य झाले नाही. ती त्याच ठिकाणी थांबली.
दरम्यान तरुण तिच्यावर नजर ठेवून होते. त्या तरुणांनी गावातील अन्य तरुणांना याची कल्पना दिली. महामार्गावरून जाणारे प्रवासी तेथे थांबू लागले. दरम्यान, कुडाळ वन कार्यालयात याबाबत कल्पना दिल्यानंतर वन विभागाचे जलद बचाव कृती पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मोकळ्या जागेत मगर असल्याने तिला पकडणे धोकादायक होते.
तिला पकडण्यासाठी जलद बचाव कृती पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले. अखेर या पथकातील वैभव अमृस्कर, अनिल गावडे व सुशांत करंगुटकर तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील (सावंतवाडी) वाहनचालक कमलेश वेंगुर्लेकर यांनी स्थानिक प्रसाद निर्गुण, यशवंत (दादा) चव्हाण, पिंट्या डेगवेकर, केदार प्रभू, सत्यवान बिर्जे, पिंट्या कुडपकर, वैभव चव्हाण व अन्य तरुणांच्या मदतीने अतिशय शिताफीने त्या मगरीला पकडले.
यासाठी तेर्सेबांबर्डे येथील विजय खानोलकर यांचेही सहकार्य लाभले. कुडाळचे सहा. पोलिस निरीक्षक जयदीप पाटील, हवालदार रत्नकांत तिवरेकर व हरेश पाटील तेथे दाखल झाले. या मगरीला रविवारी पहाटे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.