Sindhudurg News| न्यायालय उडवून देण्याच्या धमकीमुळे कामकाज ठप्प

सिंधुदुर्ग पोलिसांकडून कसून तपासणी; अज्ञाताकडून ई-मेलद्वारे धमकी
Sindhudurg News
सिंधुदुर्गनगरी : न्यायालय इमारत मुख्य प्रवेशद्वार असे बंद करण्यात आले होते. तसेच पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.
Published on: 
Updated on: 

ओरोस : सोमवारी सकाळी १० वा. १२ मिनिटांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये आलेला धमकीचा मेल दुपारी बघितला गेल्यानंतर एकच तारांबळ उडाली. पोलिसांना कळवताच बरोबर दुपारी ३ च्या सुमारास न्यायाधीशांसह न्यायालयातील कर्मचारी, वकील यांना पोलिसांनी सुरक्षितपणे न्यायालयाबाहेर काढले. त्यानंतर तब्बल ३३ मिनिटे अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बनाशक पथकाने न्यायालय इमारत आणि परिसरात कसून तपासणी केली. अखेर या तपासणीत न्यायालयाची इमारत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या इमारतीमध्ये सोडण्यात आले.

दिलजित दोसान यांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट केले जातील, असे या मेलमध्ये म्हटले होते. जिल्हा न्यायालयात दुपारी ३ वा.११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडविण्याचा इशारा दिलजितच्या जलसामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचाही इशारा यात देण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये असे म्हटले आहे की, ही तीच व्यक्ती आहे, ज्याने १९८४ मध्ये ‘रक्ताच्या बदल्यात रक्त’ अशी घोषणा दिली होती. या आवाहनामुळे शिखांचा नरसंहार झाला. २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर दिल्लीत दोसानच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट होतील, असा इशारा देताना खलिस्तान नॅशनल आर्मी, असे खाली म्हटले आहे.

सर्व खोल्या, स्वच्छतागृहे तपासल्या

दुपारी हा मेल वाचल्यानंतर न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळविले. मोठा पोलिस फौजफाटा घेऊन वरिष्ठ अधिकारी जिल्हा न्यायालय इमारतीमध्ये दाखल झाले. त्यानंतर बॉम्बनाशक पथकाने श्वानपथकासह संपूर्ण जिल्हा न्यायालयाचा परिसर तपासून काढला. जिल्हा न्यायालयाच्या सर्व खोल्या, स्वच्छातागृहे तपासण्यात आली. विधिवत सेवा इमारतीचीही तपासणी करण्यात आली. यावेळी न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, न्यायाधीश सूर्यकांत इंदुलकर यांच्यासह इतर न्यायाधीश, न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व वकील हे तपासणीच्या वेळी न्यायालय इमारतीच्या बाहेर होते. न्यायालयाच्या समोरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि बॉम्बनाशक पथक बाहेर आले. सर्व इमारत परिसर सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्वजण न्यायालय इमारतीमध्ये प्रवेशकर्ते झाले. पोलिसांनी कर्मचाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आत सोडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.