

देवगड : सांगली जिल्ह्यातील तरुण व होतकरू कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूर्ण केलेल्या कामांची शासनाने देयके थकवल्याने आर्थिक अडचणीत येऊन नैराश्यामध्ये जीवन संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने देवगड तालुका ठेकेदार संघटनेने देवगड पंचायत समिती येथे जाऊन अभियंता ठेकेदार कै. हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले गेले.
वर्षभर जलजीवन मिशनची कामे प्रगतिपथावर असूनदेखील कामांची देयके अद्यापपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली नाही, याबद्दल संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. असे प्रसंग पुन्हा घडल्यास आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, अशी संतप्त भावना संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. ही वेळ थोड्याफार फरकाने सर्वच ठेकेदार बंधूंवर येऊ शकते ही गंभीर बाब देखील निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच दिवंगत कंत्राटदार हर्षल पाटील यांच्याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेने तर्फे अध्यक्ष महेंद्र माणगावकर, बिपिन कोरगावकर, धनाजी मोहिते, सुशील लोके, लक्ष्मण सूळ, हेमंत देसाई, समीर पेडणेकर अनिल कोरगावकर, नितेश जाधव, रणजीत जाधव आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.