Sindhudurg News : बांधकाम कामगारांचे सिंधुदुर्गनगरीत ‘आक्रोश’ आंदोलन

कामागार अधिकाऱ्यांकडून प्रलंबित लाभाचे ७५०० प्रस्ताव गणेश चतुर्थीपूर्वी निकाली काढण्याचे आश्वासन
Sindhudurg News
बांधकाम कामगारांचे सिंधुदुर्गनगरीत ‘आक्रोश’ आंदोलन
Published on
Updated on

ओरोस : बांधकाम कामगारांनी मंगळवारी सिंधुदुर्गनगरीत ‘आक्रोश’ आंदोलन छेडत गेले दीड वर्ष प्रलंबित लाभाच्या प्रस्तावांबाबत आक्रमक भूमिका घेतली. अखेर गणेश चतुर्थीपूर्वी ७५००अर्ज निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर कृती समितीनेे हे आंदोलन स्थगित केले.

मंगळवारी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी सिंधुदुर्गनगरी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालया बाहेर एकत्र येत ‘आक्रोश’आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर, श्रमिक कामगार संघटनेचे प्राजक्त चव्हाण, कोंकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे संतोष तेली, बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेचे बाबल नांदोसकर वं अनिल कदम आणि निवारा बांधकाम कामगार संघटनेचे मंगेश चव्हाण,सतीश कदम,संजय सावंत,महेश ढवळे, एकनाथ नेरूरकर, अरविंद सावंत, मंगेश नारींग्रेकर यांसह ३५० ते ४०० कामगार उपस्थित होते.

मागील दीड वर्षांपासून जवळपास १४ हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. पुढील दीड महिन्यात गणेश चतुर्थीपर्यंत यातील ७५०० अर्ज निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या विविध समस्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यानंतर नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज जलद गतीने निकाली काढण्यात येतील, किट वितरण प्रक्रिया सुलभ व कामगारांना सोयीस्कर व्हावे यासाठी वितरण एजन्सी सोबत समन्वय साधून संघटनांना विश्वासात घेऊन वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व आरोग्य तपासणी योजनेच्या बाबत असलेल्या अनियमित्तांची योग्य चौकशी केली जाईल, असे लेखी आश्वासन कामगार अधिकारी श्री. खांडेकर यांनी बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती पदाधिकाऱ्यांना दिल्याने, आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर करण्यात केले.

स.११ वा. च्या सुमारास शेकडो कामगारांचा जमाव कामगार अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनासाठी जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिंधुदुर्गनगरी पोलीसचे प्रभारी अधिकारी शेखर लव्हे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना स्टेट बँक इंडिया समोरील पटांगणात थांबण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर व दुकाने निरीक्षक रविराज हुंबे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. गणेश चतुर्थी पूर्वी कामगारांचे लाभ प्रस्ताव मंजूर करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news