

सावंतवाडी ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि धामापूर (ता. मालवण) येथील सुपुत्र माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे गुरुवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या निवास स्थानावरून निघणार आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने धामापूर गावावर शोककळा पसरली आहे. सुभाष चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे विधान परिषद सदस्य म्हणून काम करताना धामापूर गावाला पर्यटनदृष्ट्या नावलौकिक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच धामापूर तलाव परिसराचा पर्यटनास आवश्यक असा सर्वांगीण विकास करण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या प्रयत्नामुळेच धामापूर गाव पर्यटनदृष्ट्या आज जगभर प्रसिद्ध आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे स्वीय सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. तर माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी ज्यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या वेळेला ते राज्याचे काँग्रेस उपाध्यक्ष होते. त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली होती तर 2014 च्या निवडणुकीतही त्यांचा मोठा सहभाग होता. गणेश चतुर्थीसह अनेक सणांना ते गावी येत असत. पर्यटन विकासाकडे त्यांचा अधिकचा लक्ष होता. जास्तीत -जास्त पर्यटक मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावेत यासाठी रिसॉर्ट उभे करण्याकरिता त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातंवंडे असा परिवार आहे.