

कुडाळ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण -२०२६ मोहिमेअंतर्गत प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
कुडाळ तहसील कार्यालयात कुडाळ-मालवण मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (सुपरवायझर) यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, मालवण निवडणूक विभागातील नायब तहसीलदार प्रिया हर्णेे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत प्रगणना फॉर्म संकलन, डिजिटायझेशन, पडताळणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या पाऊस कमी असल्याने सर्वांनी कामात गती आणून काम पूर्ण करावे. ज्या ठिकाणी कामाची गती अपेक्षेप्रमाणे नाही, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करून उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, मतदार यादीची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन वेळेत आणि त्रुटीरहित पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बी.एल.ओ.) कामाची प्रगती कमी आहे, त्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदतनीस उपलब्ध करून देऊन कामाला गती द्यावी. सर्व अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन दैनंदिन प्रगती सुनिश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बी.एल.ए.) यांचे सहकार्य घेऊन प्रत्येक मतदाराची माहिती अचूकपणे अद्ययावत करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील सर्व टप्पे विहित वेळेत पूर्ण करून प्रगणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकऱ्यांनी केले.