

कुडाळ ः कुडाळ - पिंगुळी येथील रोख रक्कम व दागिने चोरीतील आरोपी रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (30, रा. आकेरी-घाडीवाडी) यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंगुळीतील या घटनेनंतर अवघ्या 7 तासाच्या आत पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. चोरट्याचा कुडाळमधील अन्य पाच चोर्यांमध्ये हात असल्याचे समोर आले आहे. पिंगुळीतील चोरीचा काही मुद्देमालासह टीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कुडाळ पोलिसांच्या पथकाने झाराप झिरो पॉईंट येथे शुक्रवारी मध्यरात्री 12 वा. सापळा रचून पकडले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 11 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान हा संशयित रेकॉर्डवरील आरोपी असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पिंगुळी-नाबारवाडी, पिंगुळी-काळेपाणी येथे सलग दोन दिवस दोन घरफोड्या झाल्या होत्या. यातील नाबरवाडी येथील घरफोडीत 1 लाख 80 हजार रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाख 21 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या चोरीला 24 तास पूर्ण होण्याच्या आतच पिंगुळी-काळेपाणी येथे अशीच एक घरफोडी झाली होती. चोरट्याने यात 40 हजार रुपये रक्कम, सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू यासह 1 लाख 16 हजारचा मुद्देमाल चोरून नेला होता. तालुक्यातील या दोन मुख्य चोर्यांसह झाराप, माणगाव या ठिकाणीही चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. टीव्ही सारख्या चोरी घरफोडी करून झाल्या होत्या.
तालुक्यात सातत्याने होत असलेल्या या चोर्यांमुळे पोलिसांची झोप उडाली होती. कसून तपास करूनही चोरट्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. या अनुषंगाने पोलिसांनी प्रथम रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी केलेल्या या तपास कामाला अखेर शनिवारी रात्री यश आले. पिंगुळी-काळेपाणी येथील चोरीतील चोरटा रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (30, रा. आकेरी- घाडीवाडी) याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले.
चोरटा कितीही सराई असला तरी चोरीचा एक तरी पुरावा मागे ठेवतो. या चोरीतही काहीसे तसेच झाले. शुक्रवारी रात्री 10 वा. च्या सुमारास पिंगुळी-काळेपाणी येथे ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती रस्त्यावर गाडी लावून संशयास्पद फिरताना आढळली होती. पोलिसांना त्या व्यक्तीचे वर्णन त्याच्याकडे असलेली दुचाकी याची माहिती मिळाली. पोलिसांनी हाच धागा पकडत काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी केली. यानुसार पोलिसांचा आकेरी येथील रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी याच्यावर संशय बळावला. पोलिसांच्या पथकाने रात्रीकडे आपला मोर्चा वळवला.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे. उपनिरीक्षक रवींद्र भांड, पोलिस कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, फ्रीडम बुथेलो, योगेश मांजरेकर, महेश भोई या पथकाने आकेरी-घाडीवाडी येथील त्याचे राहते घर गाठले. मात्र तो घरी मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी झाराप झिरो पॉईंट येथे त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. रात्री 12 वा.च्या सुमारास संशयित पोलिसांच्या जाळ्यात अलगद फसला. पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात पोलिस स्टेशनला आणले. त्याला ‘पोलिस खाक्या ’ दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. एकामागोमाग एक अशा सुमारे पाच चोर्यांची त्याने धडाधड कबुली दिली.
यामध्ये पिंगुळी-काळेपाणी येथील मोठ्या चोरीचा समावेश होता. यामध्ये पोलिस ठाण्यात दाखल दोन चोर्या व अन्य तीन चोर्यांचा समावेश आहे. या पाचही चोर्यांमध्ये त्यांनी टीव्ही चोरला होता. पिंगुळी-काळेपाणी येथील दागिने व चांदीच्या वस्तू यांसह तालुक्यातील अन्य चोर्यांमध्ये चोरलेले टीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेे. कुडाळ-नाबरवाडी येथील चोरीमध्ये याच संशयीताचा हात असण्याची शक्यता आहे. हा संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे त्याच्या पोलिस रेकॉर्डवरून समोर आले आहे. त्याच्यावर सन 2014 मध्ये 3 घरफोड्यांचा व 2018 ‘पोस्को’चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो काही वर्षे तुरुंगात होता. ऑगस्ट 2024 मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करण्यास सुरुवात केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्याला रविवारी पहाटे 3.07 अटक केली . त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या चोरट्याने पोलिस रेकॉर्डला नोंद असलेल्या चोर्या व्यतिरिक्त अजूनही तीन चोर्या केल्या होत्या. पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्यांने अन्य तीन चोर्यांची कबुली दिली. यामध्ये पिंगुळी-चिंदरकरवाडी येथे भाड्याने राहणारे यशवंत गंगाराम नाईक यांचा टीव्ही चोरून नेला होता. यशवंत नाईक हे 9 मे रोजी घर बंद करून बाहेर गावी गेले होते. यानंतर 8 जून रोजी ते घरी आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुलेले आढळले. यातघरातील टीव्ही चोरीस केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर साळगांव-खेरवाडी येथील सीमा आकाश राऊत यांच्या बंद घरातील 4700 रोख रक्कम, 2 हजार रुपयाची चांदीची मूर्ती व 700 रुपयाचे बेन्टेक्सचे दागिने आदी माल चोरीला गेला होता.
7 जून रोजी त्या घरी आल्यावर घराचा दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहिल्यावर त्यांना रोख रक्कम व अन्य काही वस्तू चोरीस गेल्याचे लक्षात आले. झाराप तिठा येथील अशोक सिताराम रामदास यांचा एलईडी टीव्ही चोरीस गेला होता. 31 मे रोजी ते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. 7 जून रोजी घरी आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. घरात जाऊन खात्री केल्यावर आतील टीव्ही चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. या तिन्हीजणांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार या चोर्यांबाबत रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .