

सावंतवाडी ः शिक्षक साहित्यिक तथा कुणकेरी शाळा क्र.1 चे मुख्याध्यापक विठ्ठल नारायण कदम यांच्या ‘चिमण कथा’ या बालकथा संग्रहाची निवड राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषदेने (चडउएठढ) शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शिक्षक लेखकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषदेने ग्रंथ निर्मिती उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत विठ्ठल कदम यांचा ‘चिमण कथा’ हा बालकांच्या भावविश्वावर आधारित 40 कथांचा संग्रह शासनाने प्रकाशित केला आहे. हा कथासंग्रह आता महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयात उपलब्ध झाला असून, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाकडून याचे उत्साहात स्वागत होत आहे.
महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विठ्ठल कदम यांचे यापूर्वी ‘एकदा काय झाले?’ हा कथासंग्रह, ‘चार पावलं दूर...’ ही बालक कादंबरी आणि ‘तुझा पदर तिरंगा’ हे बालसाहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांचा ‘रूमणी’ हा काव्यसंग्रह देखील साहित्य क्षेत्रात चांगला गाजला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मनोहर परब आणि रामजी पोळजी यांच्या पुस्तकांचाही या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.विठ्ठल कदम हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळावर सदस्य असून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या बालकथा संग्रहाची राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
‘चिमण कथा’ या पुस्तकात ‘चिमण’ नावाचा एक मुलगा नायक आहे. तो आपल्या आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करतो आणि त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करतो. या कथांमध्ये चिमण पालक, शिक्षक आणि आपल्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना दिसतो.