Navy Day in Sindhudurga : सिंधुदुर्गात होणारा नौसेना दिन महाराष्ट्रासाठी भूषण; मुख्यमंत्री

Navy Day in Sindhudurga : सिंधुदुर्गात होणारा नौसेना दिन महाराष्ट्रासाठी भूषण; मुख्यमंत्री
Published on
Updated on

मालवण; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 4 डिसेंबर रोजी होत आहे. महाराष्ट्र व देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यासोबतच नौसेना दिन सिंधुदुर्ग येथे होत आहे, हेही महाराष्ट्रासाठी भूषण आहे. हे दोन्ही कार्यक्रम 'न भूतो न भविष्यती' असे होतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले राजकोट येथे बोलताना व्यक्त केले. पंतप्रधान मोदी याच्या संकल्पनेतून तो सिंधुदुर्गात होत आहे. हा कार्यक्रम छ. शिवाजी महाराजांना मोठा मानाचा मुजरा आहे, असेही ते म्हणाले.

किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसरात होणारा नौसेना दिन सोहळा म्हणजे आरमारचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन, अशा स्वरूपात हा सोहळा असणार आहे. या संपूर्ण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, शासनाच्या माध्यमातून सर्वत्र जय्यत तयारी सुरू असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

किल्ले राजकोट येथे नेव्ही तसेच राज्य सार्व. बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आ. रवींद्र फाटक, माजी खा. नीलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सा. बां. चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,

तहसीलदार वर्षा झालटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ.राजन तेली, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, सा. बां. च्या कुमुदिनी प्रभू, नौदल, पोलिस तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेले दोन महिने राजकोट येथे नौदल व शासनाच्या वतीने शिव पुतळा उभारण्याचे काम हाती घेत ते मार्गी लावण्यात आले आहे. येत्या 4 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होईल. नौदल विभागाच्या ध्वजावरही शिवमुद्रा लावण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही एक दैवी कृपा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम 'न भूतो न भविष्यती' असा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नौसेना दिन हा पूर्वी दिल्लीत व्हायचा. मात्र, पंतप्रधानांच्या संकल्पनेतून तो यावर्षी सिंधुदुर्गात साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हा मोठा मानाचा मुजरा आहे. कारण शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. त्यांनी देशातील पहिले आरमार आपल्या राजवटीत सुरू केले. त्याची दखल पंतप्रधानांनी आणि नौदल विभागाने घेऊन नौसेना दिन येथे साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानतो. – मुख्यमंत्री शिंदे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news