अंतिम निर्णय होईपर्यंत छत्रपतींचा पुतळा स्थलांतर करणार नाही

महामार्ग प्राधिकरणाच्या लेखी पत्राअंती झाराप येथील मराठा महासंघाचे उपोषण स्थगित
Chhatrapati shivaji Maharaj statue relocation
झाराप ः छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासंदर्भात मराठा महासंघाचे प्रतिनिधी व शिवप्रेमी यांना लेखी पत्र देताना महामार्ग विभागाचे अभियंता साळुंखे.pudhari photo
Published on
Updated on

कुडाळ : झाराप-जांभळस्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरबाबत महामार्ग व संबंधित प्रशासन उदासीन भूमिका घेत आहे पुतळ्यासाठी देण्यात आलेली जागा धोकादायक असून याबाबत प्रशासनाने कोणतीही रितसर कार्यवाही केली नाही. प्रशासनाकडून घाईगडबडीत या पुतळ्याचे स्थलांतरण करण्यात येत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचा आरोप करत याविरोधात मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी झाराप येथे उपोषण छेडले. यावेळी महामार्ग प्रशासनाने जिल्हाधिकारी दालनात संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय होईपर्यंत पुतळा स्थलांतर करणार नसल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप -जांभळ स्टॉपनजीक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत सद्यस्थितीत झिरो पॉईंट येथे बॉक्सवेल काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बॉक्सवेलच्या सर्व्हिस मार्गात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत आहे. त्यामुळे हा पुतळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक आहे. मात्र, पुतळ्याबाबत महामार्ग प्रशासनाने सुरुवातीपासूनच उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामस्थ व शिवप्रेमींचा आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाला निवेदने देऊन तसेच कुडाळ पोलिस निरीक्षकांच्या दालनात बैठका घेऊनही योग्य तोडगा न निघाल्याने स्थानिक शिवप्रेमी यांनी उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला. याला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी पाठिंबा दर्शविला होता.

यानुसार शनिवारी झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीकच उपोषण छेडण्यात आले. या आंदोलनाबाबत मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी कुडाळ पोलिसांना तर सामाजिक कार्यकर्ते रूपेश बिडये यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांना 12 फेब्रुवारी रोजी पत्राने दिला होता. या पत्राच्या अनुषंगाने मराठा महासंघाचे प्रतिनिधी, झाराप सरपंच, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष कुडाळ पोलिस निरीक्षक यांच्या दालनात एक बैठक झाली होती. यानुसार हा पुतळा स्थलांरित करण्याची जागा सर्व संमत्तीने ठरविली जाईल व पुतळ्याची रचनासुध्दा शिवप्रेमींच्या सूचनेप्रमाणे करण्यात येईल, असे ठरले होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी कार्यालयाचे सहा.अभियंता यांनी सामाजिक कार्यकर्ते रूपेश विडये यांना 20 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले. या पत्रात पोलिस निरीक्षकांच्या दालनात झालेल्या चर्चेचा ओझरता उल्लेख आहे. या पत्रावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नसल्याचे रूपेश बिडये यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ पुतळ्याच्या ठिकाणी शनिवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कोण आहेत, हे आपल्याला माहीत आहे का? असा प्रश्न साळुंखे यांना केला. पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जागे शेजारी महावितरणचा ट्रान्स्फार्मर आहे. अशा ठिकाणी कोणतेही कार्यक्रम करणे धोकादायक ठरणारे आहे. अखंड रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अशी धोकादायक जागा देणे हे अवमानकारक आहे. तसेच नवीन पुतळ्याचा ढाचा उभारणीचे कामही निकृष्ट आहे, असा आरोप मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

मराठा महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष परब, मराठा महासंघ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, शिवप्रेमी रूपेश बिडये, आशिष काष्टे, विनायक गावडे, पुंडलिक दळवी, प्रसाद राऊळ, विशाल सावंत, संदीप गवस, आशिष जळवी आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news