

दोडामार्ग : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत नगराध्यक्ष चेतन चव्हाण व माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी एकत्र येत केले. मुळात पालकमंत्री राणे यांनीच या आजी-माजी नगराध्यक्षांमधील कलह दूर करण्यासाठी एकत्र आणले व दोघांच्या हस्ते चाफ्यांची पुष्पे स्वीकारल्याची चर्चा आहे. शिवाय त्यांना एकत्र काम करून पक्ष संघटना बळकट करण्याचा कानमंत्रही दिला. आता पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे भविष्यात हे एकत्र राहून काम करतील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
दोडामार्ग नगरपंचायतीतील भाजपा गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहेे. शहर प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याच्या विषयावरून भाजपच्या वरील दोन मातब्बर प्रतिनिधांमध्ये उडालेली शाब्दिक चकमक चसंगलीच गाजली होती. या विषयावरून या दोन आजी-माजी नगराध्यक्षामधील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांची डोकेदुखी वाढली होती.
दोडामार्ग शहर भाजपमध्ये चेतन चव्हाण समर्थक आणि संतोष नानचे समर्थक असे दोन गट नगरपंचायतीत खुलेआत सक्रिय होते. यामुळे भाजपा जिल्हा आणि राज्य नेतृत्वापुढे हा वाद मिटवण्याचे आव्हान होते. आगामी वर्षभरात नगरपंचायत निवडणूक होणार असताना, अशी अंतर्गत फूट पक्षासाठी ‘आत्मघातकी’ ठरण्याची शक्यता होती.
पालकमंत्री नितेश राणे दोडामार्ग दौर्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक संतोष नानचे चाफ्यांची फुले घेऊन उभे होते. यावेळी पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना देखील तेथे बोलविले. दोघाही आजी-माजी नगराध्यक्षांना कानमंत्र देत त्यांच्या हस्ते पुष्पे स्वीकारली. पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी उकत्र आलेले हे आजी-माजी नगराध्यक्ष भविष्यातही असेच एकत्र राहतील का? याबाबत मात्र राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी शहर प्रारूप विकास आराखड्यावरून पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी झालेल्या भाजपा मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी दोघांची चांगलीच कानउघडणी केली. यापुढे कोणीही पत्रकार परिषद घेणार असल्यास जिल्हाध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेे स्पष्ट करत दोघांसहीत सर्वांनाच पक्षशिस्त पाळण्याच्या सक्त सूचना दिल्या.