

देवगड : आपल्या घरासमोरील सार्वजनिक जागेत एका व्यक्तीने खासगी उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. त्यामुळे गोपनीयतेला धोका निर्माण झाला असून, त्याचा परिणाम आमच्या वैयक्तिक जीवनावर झाला आहे. याबाबतची तक्रार देवगड पोलिस स्थानकात करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाने कारवाई करून हा कॅमेरा त्वरित काढावा. अन्यथा, 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा वाडातर येथील सौ. अक्षता जयंत वाडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी देवगड तहसीलदार यांना दिले आहे.
सौ. वाडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे, आमच्या घरासमोरील एका व्यक्तीने सार्व. ठिकाणी आपल्या घराच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. त्यामुळे आमच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होत असून घराच्या परसात, अंगणातील महिलांच्या हालचाली व लहान मुलींचे दृश्य या कॅमेराद्वारे टिपले जात असल्याचा आम्हाला संशय आहे. याबाबत एप्रिल-2025 मध्ये आम्ही देवगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे तो सीसीटीव्ही कॅमेरा त्वरित हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी.
कॅमेरात रेकॉर्ड झालेले सर्व फुटेज तपासण्यात यावे. तेथील अनधिकृत गाड्या पार्किंग हटवावे,अशी आमची मागणी आहे. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी देवगड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि कॅमेरा काढला जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेण्यात येणार नाही, असे सौ. वाडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.