कुडाळ : पुढारी वृत्तसेवा आंबोली घाटातील पायथ्याशी दाणोली नजिक असलेल्या पारपोली गावात फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिट्यपूर्ण सुक्ष्म वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध असल्याने सुमारे १८० हुन अधिक विविध प्रकारची फुलपाखरे आढळून आली आहेत. गतवर्षीच्या दोन दिवसीय फुलपाखरु महोत्सवाला पर्यटकांकडुन तसेच निसर्ग प्रेमींकडुन मिळालेला उत्तुंग प्रतिसाद पाहता यावर्षी ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंतचा चार महिन्यांचा संपुर्ण फुलपाखरु हंगाम फुलपाखरु महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली यांनी नियोजन केले आहे, अशी माहिती वनविभागामार्फत देण्यात आली. यावर्षीच्या फुलपाखरु हंगामात पर्यटकांना फुलपाखरु पदभ्रमंती, जंगल ट्रेक, सर्व सुखसोयीनीयुक्त होम स्टे तसेच मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. निसर्गप्रेमीसह पर्यटकांनी या फुलपाखरु महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पारपोली ग्रामपंचायतीने केले आहे. फुलपाखरु महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मेहबुब नाईकवडे व सनिकेत पाटील यांच्याशी संपर्क साधावा.