सावंतवाडी : सावंतवाडी येथील एका 72 वर्षीय वृद्ध महिलेची बस प्रवासादरम्यान पर्समधून 4 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 800 रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता रविंद्र माने (वय 72, रा. वाफोली टेंबवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) या त्यांच्या पतीसोबत काल बुधवारी दुपारी दीड वाजता एसटीने देवगडहून सावंतवाडी येथे आल्या त्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजता त्या सावंतवाडी ते पणजी या कदंबा बसने बांदा येथील त्यांच्या घरी परत जात होत्या.या प्रवासादरम्यान त्यांच्या पर्सची चैन उघडी दिसल्याने त्यांनी तपासणी केली असता, पर्समधील छोट्या पाकिटात ठेवलेले 4 तोळ्यांचे दागिने (मंगळसूत्र व हार) आणि 800 रुपये रोख चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घडलेली घटना आज दुपारी सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार मंगेश शिंगाडे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील आणि हवालदार धोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.