कणकवली प्रांत कार्यालयावर बौद्ध बांधवांचा मोर्चा

Buddhist society protest: महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी
Mahabodhi temple protest
कणकवली ः मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी बौद्ध समाज बांधव.pudhari photo
Published on
Updated on

कणकवली : बिहार येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, 1949 चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करावा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या कणकवली शाखेच्या वतीने ज्येष्ठ संघटक सुमंगल कुंभवडेकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बौद्ध समाज बांधवांनी हातात पंचशील झेंडे घेऊन भर दुपारी रणरणत्या उन्हात एस. एम. हायस्कूल ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

या मोर्चानिमित्त कणकवलीत बौद्ध समाज बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडविले. ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे’ यासह अन्य घोषणाबाजी करत कणकवली शहर परिसर दणाणून सोडला. मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना दिले.

जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या बिहार-बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध भिक्खुंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी हा मोर्चा काढण्यात आला. ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे’, ‘1949 चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करावा’, ‘तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो’, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘बोलो रे बोलो जय भीम बोलो’ अशी घोषणा करत बौद्ध बांधवांनी परिसर दणाणून सोडला.

या मोर्चाद्वारे बोधगया टेम्पल कायदा (बीटीए) 1949 रद्द करावा व महाबोधी महाविहार हे पवित्र स्थळ पूर्णत: बौद्धांच्या ताब्यात मिळावे, या मागणीचे निवेदन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. भंतो अश्वजित, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, कणकवली तालुकाध्यक्ष भाई जाधव, सरचिटणीस सुभाष जाधव, कोषाध्यक्ष महेंद्र कदम, महामोर्चा संरक्षण व्यवस्था प्रमुख समता सैनिक दलाचे दिलीप कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सूर्यकांत कदम, श्रद्धा कदम, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा हरकुळकर, रंजना कांबळे, दीपक कांबळे, सुधाकर जाधव, नीलेश कांबळे, अ‍ॅड. संदीप कांबळे, अनिल तरंदेळकर, संतोष हरकुळकर, प्रभाकर साकेडकर, अर्जुन कांबळे यांच्यासह बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.

एस. एम. हायस्कूल ते आप्पासाहेब पर्टवर्धन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालय असा हा मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सुमंगल कुंभवडेकर, विश्वनाथ कदम, सूर्यकांत कदम, श्रद्धा कदम, महेश परुळेकर, आनंद कासार्डेकर, सुषमा हरकुळकर, दीपक कांबळे यांनी मार्गदर्शन केले. मोर्चादरम्यान पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news