Gangava Hanchimani murder | प्रेमाच्‍या नात्याचा शेवट अखेर रक्तरंजित कटात!

लग्नाच्या आड येत असल्याच्या संतापातून शिक्षकाने प्रेयसीला कायमचे संपवले
Gangava Hanchimani murder  |
Gangava Hanchimani murder | प्रेमाच्‍या नात्याचा शेवट अखेर रक्तरंजित कटात!
Published on
Updated on

ओम देसाई

दोडामार्ग : प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेल्या नात्याचा शेवट अखेर रक्तरंजित कटात झाला. लग्नाच्या आड येत असल्याच्या संतापातून एका शिक्षकाने आपल्या प्रेयसीला कायमचे संपविण्याचा निर्णय घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कर्नाटक राज्यातील धारवाड-हुबळी जिल्ह्यातील गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी हिचा खून हा कोणत्याही क्षणिक वादातून नव्हे, तर नियोजनबद्ध कटातून झाल्याची कबुली मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करण्णावर याने पोलिसांसमोर दिली आहे. विशेष म्हणजे या कटात त्याच्या वडिलांसह मामाचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हुबळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेला बसवराज आणि गंगव्वा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये सातत्याने संपर्क होता. मात्र कालांतराने या नात्यात तणाव निर्माण झाला. बसवराजच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न ठरविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचवेळी गंगव्वा या विवाहाला विरोध करीत असल्याने आणि काही प्रस्तावांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने बसवराजच्या मनात तिच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, गंगव्वामुळे आपले वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होईल, अशी भीती बसवराजला वाटत होती. त्यातूनच तिला कायमचे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत त्याने वडिलांची आणि मामाची मदत घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. बसवराज याने गंगव्वाला प्रथम दुचाकीने बेळगावमध्ये आणले. त्यानंतर क्रुझर गाडीने तिघांनी मिळून गंगव्वाला विश्वासात घेतले आणि तिला सोबत घेऊन तिलारी घाटात आणले. त्यानंतर तिचा खून करून तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ तिचा मृतदेह टाकल्याची कबुली बसवराज याने पोलिसांना दिली.

सुरुवातीला हे प्रकरण गूढ वाटत असले तरी आरोपींच्या कबुलीजबाबामुळे संपूर्ण कटाचा उलगडा झाला आहे. प्रेमातून निर्माण झालेला संघर्ष, लग्नाच्या आड येण्याची भीती आणि त्यातून जन्माला आलेली सूडाची भावना अखेर एका तरुणीच्या जीवावर बेतली. याप्रकरणी शिक्षक बसवराज यल्लाप्पा करण्णावर (३३), त्याचे वडील यल्लाप्पा मल्लाप्पा करण्णावर (५७) आणि मामा लगमाप्पा अंकलगी (३७) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खून केल्यानंतर परतताना क्रुझर गाडीला झालेल्या अपघातात जखमी वाहनचालकावर उपचार सुरू असल्याने त्याची अद्याप चौकशी झालेली नाही. त्याच्याकडूनही या कटाबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

'प्रेम' ते 'खून' : नात्याचा भयावह शेवट

एकेकाळी एकत्र जीवनाच्या भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दोन व्यक्तींमधील नाते अखेर वैरात परिवर्तित झाले. लग्नाच्या प्रश्नावरून वाढलेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेला राग इतका टोकाला गेला की, त्याचा शेवट थेट खुनात झाला. त्यामुळे या प्रकरणाने प्रेमसंबंधांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news