

बांदा : गोवा दारूची बेकायदा वाहतूक करणार्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत साडेतील लाखाची तब्बल 35 बॉक्स गोवा दारू आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 8 लाख 49 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सावंतवाडी येथील तन्झिल सईद शेख (27) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली परिसरात वाहन तपासणी मोहीम सुरू होती. गुरूवारी स. 8 वा. च्या सुमारास गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने येणार्या महिंद्रा बोलेरो वाहनास अडवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, मागील हौद्यात भाजीपाल्याच्या रिकाम्या क्रेेटखाली लपवून ठेवलेली गोवा विदेशी दारू आढळून आली. या कारवाईत 35 बॉक्स विदेशी दारू (अंदाजे किंमत 3 लाख 49 हजार 320 रुपये) तसेच 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण 8 लाख 49 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गचे अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक बायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सूर्यवंशी यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.