

वैभववाडी ः वैभववाडी बाजारपेठेत पोलिस स्टेशनसमोर वैभव लक्ष्मी पेट्रोल पंपाच्या कंपाऊंड मध्ये सुमारे 30 ते 35 वर्षाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. त्यामुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पेट्रोल पंप मालक स्नेहल संतोष रावराणे (वय 55, रा. माईणकरवाडी) यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात खबर दिली. या तरुणाच्या अंगावरून वाहन गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा,अशी प्रथम दर्शनी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
स्नेहल रावराणे या गुरुवारी स. 7. 15 वा. च्या सुमारास पेट्रोल पंप आवारात फिरत असताना त्यांना पेट्रोल पंपाच्या पूर्वेकडील भिंती नजीक एक तरुण पडलेला दिसून आला. त्यांनी त्याला हाक मारली असता त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली.यानंतर सहा. पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ, हरित जायभाय, जितेंद्र कोणते, अभिजीत तावडे, अजय बिलपे, समीर तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी तो तरुण मृत असल्याचे समजले.
मृतदेहावरील जखमा, व्रण व मृतदेहाची झालेली छिन्नविच्छीन अवस्था पाहता त्याच्या अंगावरून एखादे अवजड वाहन गेले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेहाच्या अंगावर निळसर रंगाचा टी-शर्ट व निळसर रंगाची फुल पॅन्ट होती. मात्र त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू अथवा कागदपत्र त्याच्याजवळ आढळून आली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्याने अंगात घातलेला क्रिकेट टी-शर्टवर ‘गजबादेवी’ व ‘पतु’ असे लिहिलेले आहे. यावरून पोलीसांनी श्री गजबादेवी मंदिर असलेल्या देवगड- मिठबाव येथे चौकशी केली असता ‘पतु’ टोपण नाव असलेला तरुण गावात असल्याचे सांगितले. पाच महिन्यापूर्वी मुंबई येथून त्याची बॅग चोरीस गेली होती. त्या बॅगेत असे लिहिलेले टी शर्ट होते. दोन वर्षांपूर्वी ते टी शर्ट छापण्यात आले होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली. चोरीला गेलेल्या बॅगेतील ते टी शर्ट त्या मयत तरुणाकडे कसे आले. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, सदर मयत तरुण बुधवारी वैभववाडी बाजारपेठ तसेच सांगुळवाडी येथे सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेचे सामने बघण्यासाठी गेला होता अशी चर्चा आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्याची ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. वाहनाच्या टायर खाली चिरडून त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तसेच या अपघाताची माहिती न देता निघून गेल्या प्रकरणी पोलिसानी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.
स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी वैभववाडी पोलिस ठाणे येथे भेट देऊन माहिती घेतली. तसेच पोलिस शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. पेट्रोल पंपासमोर असलेला नगरपंचायतीचा सीसीटीव्ही बंद असल्यामुळे नेमका तो तरुण त्या ठिकाणी कसा आला किंवा त्याचा अपघात कसा झाला हे समजू शकले नाही.