

ओरोस ः जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सिंधुदुर्ग भाजपाच्यावतीने 5जून पासून पुढील महिनाभर शाळा परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील विविध शाळांच्या आवारात संबधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावे 4500 फळझाड वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालयात जागतिक पर्यावरण दिनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा किसान आघाडी जिल्हा देश उपाध्यक्ष डॉ. भाई बनकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, राजू राऊळ, सरचिटणीस गुरुनाथ पाटील, महेश संसारे, महादेव सावंत आदीं उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा कार्यालय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली.
प्रभाकर सावंत म्हणाले जागतिक पर्यावरण दिन हा संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केला आहे. जगातील 143 देशांमध्ये हा पर्यावरण दिन साजरा केला जातो. यावर्षी दक्षिण कोरियाने या दिनाचे यजमानपद घेतले आहे. पर्यावरण संवर्धन ही सर्वांचीच जबाबदारी असल्याने भाजपाने हा महिना वृक्ष संवर्धन मास म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शाळा स्तरावर फळझाड लागवड तसेच अन्य वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
गतवर्षी ही पर्यावरण दिनी भाजपच्यावतीने 12 हजार झाडे लावण्यात आली. परंतु ही झाडे लागवड केल्यानंतर त्याची जोपासना न झाल्याने यातील काही झाडे मृत झाली. यासाठी यावर्षी लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. शाळा परिसराबरोबरच कोकण रेल्वे मार्ग व अन्य सार्वजनिक ठिकाणी ही वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच वेंगुर्ला येथे कासव संवर्धन उपक्रम हाती घेतला जात असल्याचे श्री. सावंत म्हणाले.
पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्तीवर भर देणे आवश्यक आहे प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी भाजपा शाळा स्तरावर जनजागृती करणार आहे. प्लास्टिक बॉटलचा वापर कमी करावा, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात यावर भर दिला जाणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त जिल्हा भाजपच्या वतीने 9 जून ते 9 जुलै या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात प्लास्टिक जगजागृती, 21 जून रोजी जागतीक योगा दिन, 25 जून रोजी आणीबाणी दिन अशा विविध उपक्रमांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.