

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय राणे यांची घराणेशाही आणि मला आणि कार्यकत्यांना राणे कुटुंबियांकडून होणारा त्रास यामुळे मी भाजप सोडत आहे, असे कारण माजी आमदार राजन तेली यांनी भाजपचा राजीनामा देताना स्पष्ट केले आहे. त्याशिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला खूप प्रेम दिले असे सांगत मी शिवसेनेत होतो आता पुन्हा शिवसेनेत जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी गुरुवारी रात्री पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबईत 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून 'मशाल' हाती घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली मते व्यक्त केली. त्याशिवाय राजीनामा पत्रातही त्यांनी आपल्या व्यक्त केल्या आहेत.
राजन तेली यांनी भाजपा श्रेष्ठींना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, आपण भाजप पक्षाचे काम करत असताना आपल्याला माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खा. नारायण राणे कुटुंबीयांकडून त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात आला. पक्षांतर्गत होणाऱ्या या कुरघोड्यांना कंटाळून आपण पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना त्यांनी हे राजीनामा पत्र पाठवले आहे. गेली १० वर्षे मी आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे दिवसरात्र मेहनत करून सर्वांना बरोबर घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आपण सर्वांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.
सन २०१९ ला शिवसेना-भाजप युती असतानाही कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी देऊन भाजपाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात उभे केले होते. यासाठी भाजपनेही मला सावंतवाडी मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत 'एबी' फॉर्म दिला होता. परंतु भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण संघटनमंत्री सतीश धोड यांच्याकडून निरोप आला की 'शिवसेनेकडून चूक झाली असेल तरी आपण चुक करता कामा नये' पक्ष नेतृत्वाची ही सूचना शिरसंवाद मानून मी हातात पक्षाचा 'एबी फॉर्म असतानाही केसरकरांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली.
दरम्यान मला राणे कुटुंबीयांचा अंतर्गत होत असलेला त्रास, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. यापूर्वी फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदार संघात वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. मात्र राणे कुटुंबीय भाजपा पक्षात दाखल झाल्यानंतर आमचे खच्चीकरण करण्याचे काम पुन्हा सुरू झाले, त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राणे कुटुंबिय राबवित आहेत.
आपण घोटने सारख्या ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलो. कष्टाने आपली राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे १०० टक्के प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही. याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो हे मी समजू शकतो. तरी माझा भाजपा प्राथमिक सदस्य तसेच भाजपा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती त्यांनी या राजीनामा पत्रामध्ये केली आहे.