

कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणार्या करूळ घाटा इतकाच महत्त्वाचा व त्याला पर्यायी असलेला भुईबावडा घाट आहे. गेली दीड वर्षे करूळ घाट दुरूस्तीसाठी बंद असताना वाहतुकीचा सर्व भार हा भुईबावडा घाटाने पेलला होता. सार्व. बांधकाम विभागाने गेली दोन वर्षे विशेष लक्ष देऊन या घाटमार्गातील दुरुस्तीची कामे केली आहेत.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने दरडी कोसळून झालेले नुकसान, संरक्षक भिंती, क्रश बॅरिअर, मोर्यांची कामे,गटार दुरुस्ती व गाळ काढणे, मोर्यांची सफासफाई, सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा घाट पावसाळी हंगामासाठी सज्ज झाला आहे.
भुईबावडा घाट हा सुमारे 12 कि. मी लांबीचा आहे. करूळ घाटाला पर्यायी असलेल्या या घाटमार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकामकडून यापूर्वी नेहमीच दुय्यम स्थान देण्यात येत होते. मात्र तीन वर्षांपूर्वी करूळ घाटमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाल्यानंतर सा. बां. विभागाकडे भुईबावडा हा एकच घाट मार्ग राहिला असून गेल्या दोन -तीन वर्षात घाटाच्या देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
गेल्या पावसाळ्यात करूळ घाट बंद असल्यामुळे संपूर्ण वाहतुकीचा भार भुईबावडा घाटाने पेलला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात घाटात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या होत्या, त्यामुळे रस्ता खराब झाला होता. त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. रिंगेवाडीजवळ मोरी वाहून गेलेली मोरी नव्याने बांधण्यात आली आहे. तर एका ठिकाणी कोसळलेली संरक्षक भिंत पुन्हा नव्याने बांधण्यात आली आहे. संरक्षक भिंत मजबूत राहावी यासाठी काउंटर पोर्ट ऑल प्रकारची संरक्षण भिंत तसेच काही ठिकाणी गॅबियन भिंती बांधण्यात आल्या आहेत. घाटमार्गातील पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी काही गटर काँक्रिटकरण व गटरची साफसफाई करण्यात आली आहे.
दरवर्षी मोर्या गाळाने भरल्यामुळे रस्त्यावर पाणी येत होते. खबरदारी म्हणून सर्व मोर्याची सफाई करण्यात आली आहे. या घाटमार्गात रात्रीच्या वेळी दाट धुके असते. या धुक्यातून रात्रीच्यावेळी वाहचालकांना रस्त्याचा अंदाज यावा यासाठी संपूर्ण घाट रस्त्याच्या दोन्हीही बाजूने पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रिप्लेक्टर बसवण्यात आले आहेत. यावर्षी देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 65 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर गेल्यावर्षीच या घाटमार्गाचे रूंदीकरण 5. 5 मीटर करण्यात आले आहे. तसेच बाजूपट्टयाचे काम करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत या घाटमार्गात दरड कोसळण्याचे कोणतेही संभाव्य ठिकाण नाही. मात्र पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अचानक कोसळणार्या दरडी हटविण्यासाठी गगनबावडा व भुईबावडा येथे खाजगी जेसीबी सज्ज ठेवण्यात आले असून घाटात दरड कोसळल्यास ती तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे नियंत्रण कक्ष आहेत. याठिकाणी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.
भुईबाववाडा घाटातील वरचे तीन कि. मी. रस्ता अरुंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिअवजड व जास्त लांबीची वाहने गेल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे अति अवजड व लांब वाहने चालकांनी घाटातून वाहने घेऊन जाऊ नये, असे आवाहन सार्वजनिक बांधमाचे उपअभियंता श्री.जोशी यांनी केले आहे. या वाहनांच्या रहदारीमुळे घाटातील संरक्षण भिंतीना वाहनांचा धक्का लागून कोसळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठया संख्येने पर्यटक येतात. हे पर्यटक करूळ व भुईबावडा घाटातून जिल्ह्यात येतात. या पर्यटकांना सह्याद्रीतील जैवविविधतेची माहिती व्हावी यासाठी घाटात प्राण्यांची चित्र रेखातून घाट बोलका करण्याचा प्रयत्न सार्व.बांधकाम विभागाने केला आहे. पावसाळ्यात घाटात मोठ्या संख्येने धबधबे प्रवाहित होतात. त्याचा आनंद घेण्यासाठी पावसात पर्यटक घाटात येतात. यासाठी करूळ घाटाप्रमाणे पर्यटन पॉईंट तयार करावेत,अशी मागणी होत आहे.