

वेंगुर्ले : अजय गडेकर
उत्कृष्ट संसदपटू, उत्तम वक्ते असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणासाठी व देशासाठी केलेले कार्य हिमालयाएवढे आहे. त्यांनी येथील विकासाला चालना देण्यासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. वेंगुर्ले येथे उत्कृष्ट असे बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र साकारले आहे. उत्कृष्ट आचारविचार देणारी स्मारके व्हावीत तर स्मारकाची दखल घेणारे नागरिक हवेत. या समुदाय केंद्रातून बॅरिस्टर नाथ पै यांचे आचारविचार सर्वदूर पोहचले पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार तथा माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथे केले.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले , बॅ. नाथ पै यांच्या पुस्तक प्रकाशन वेळी पै कुटुंबीयांनी मांडलेली इच्छा आज साकार होत आहे .हे विचारांचे केंद्र आहे. हे समुदाय केंद्र नाथ पै यांचे चरित्र, नेतृत्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे स्मारक नगरपरिषदेने आहे तसे टिकवावे. नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी, वेंगुर्ले तालुक्यात खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युपीएससी, एमपीएससी सेंटर उभे करू, असे ना.सामंत म्हणाले.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर बोलताना म्हणाले , नाथ पै हे संपूर्ण भारताचे नेते होते. त्यांनी एक समाजवादी विचार जगभर नेला. समुदाय केंद्रात नाथांच्या विविध स्मृती जपण्यात आल्या आहेत.तालुक्यात युपीएससी , एमपीएससी सेंटर येत्या १५ दिवसात सुरु करा.त्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देईन , असे यावेळी केसरकर म्हणाले. किरण ठाकूर यांनी बोलताना नाथ पै यांच्या स्मृतींना उजाळा दिला .या समुदाय केंद्रातून नाथ पै यांचे ध्येय पुढे नेण्याचा प्रयत्न करणार ,असे अदिती पै म्हणाल्या.या समुदाय केंद्राद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री. कंकळ यांनी बोलताना सांगितले. यावेळी मान्यवर ,आर्किटेक्ट व कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. कांकळ , सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले.
वेंगुर्ले कॅम्प येथे शासनातर्फे साकारलेल्या बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.१४) संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत , किरण ठाकूर , नाथ पै फाऊंडेशन अध्यक्ष अदिती पै, शैलेश पै ,जिल्हाधिकारी अनिल पाटील, न. प.प्रशासक हेमंत निकम, मुख्याधिकारी परिपोष कांकाळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पद्मश्री परशुराम गंगावणे , माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, न. प. प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल ,बॅरिस्टर नाथ पै कॉलेज चेअरमन उमेश गाळवणकर, लॉ कॉलेजचे चेअरमन व्हिक्टर डांटस आदी उपस्थित होते.या कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक व नाथ पै समर्थक उपस्थित होते.